उरण : दुबईस्थित 'एग्लो कमोडिटीज एफजेडई'या कंपनीची तब्बल ८४ लाख ४८ हजार ५०० डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकावर आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोझांबिकमधून आयात केलेल्या तुरीच्या डाळीचे पैसे न देता विश्वासघात केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती- नुसार, तक्रारदार सुशांत पडवळ हे दुबईस्थित 'एग्लो कमोडिटीज एफजेडई' या कंपनीचे भारतीय प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. अंधेरी पश्चिम, मुंबई येथील एका कंपनीचे मालक विक्रम आणि त्यांची पत्नी कृपा यांनी फिर्यादीच्या कंपनीकडून २०२४ पासून नियमितपणे तुरीची डाळ खरेदी केली होती.
सुरुवातीला वेळोवेळी मालाचे पैसे वेळेवर चुकवल्यामुळे त्यांनी कंपनीचा विश्वास संपादन केला होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन, ७ मार्च ते १० मे २०२५ या कालावधीत आरोपींनी मोझांबिक देशातून २६,२७५ मेट्रिक टन तुरीची डाळ (प्रति मेट्रिक टन ८०० अमेरिकन डॉलर प्रमाणे) जेएनपीए, न्हावा शेवा बंदरात आयात केली.
या एकूण २ कोटी १० लाख २० हजार अमेरिकन डॉलर किमतीच्या मालापैकी आरोपींनी १ कोटी २५ लाख ७१ हजार अमेरिकन डॉलर इतकी रक्कम कंपनीला अदा केली. मात्र, उरलेली ८४ लाख ४८ हजार ५०० अमेरिकन डॉलर इतकी उर्वरित रक्कम देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी विक्रम व कृपा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.