

अलिबाग : जिल्हा रुग्णालयाची इमारत समुद्र नजीक असल्याने सीआरझेड क्षेत्रात येत होती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य मंत्राच्या उपस्थितीत भूमिपूजन होऊनही प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळण्यास 6 महिनेच विलंब लागला. आता एमसीझेडएमए कमिटीने मान्यता दिल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ही जीर्ण झाली होती. राज्य सरकारकडून नवीन इमारतीसाठीच्या कामाला मंजुरी दिली होती. 5 मार्च रोजी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. मात्र ही इमारत सीआरझेडमध्ये येत असल्याने या बांधकामाला मंजुरी मिळण्यासाठी एमसीझेडएमए कमिटीने मान्यता मिळणे आवश्यक होते.
जी बांधकामे सीआरझेडमध्ये येतात त्यांना मंजुरी देण्यासाठी राज्यात एमसीझेडएमए कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीचा कार्यकाळ डिसेंबर 2024 मध्ये संपला होता. नवीन कमिटी गठीत होण्यास उशीर झाला. त्यामुळे निधी येऊनही बांधकाम करणे शक्य नव्हते. नवीन समिती आल्यांनतर पहिल्याच बैठकीत अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकाम प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
लवकरच इमारतीचे काम सुरु होणार आहे. सध्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट आहे तो तातडीने हलविण्यात आला आहे तर रक्तपेढीची इमारत रिकामी करण्यात येत आहे. लवकचर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
2 लाख चौरस फुटांची सात मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार आहे. 300 खाटांच्या या नवीन इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे. केंद्राच्या नियमानुसार पब्लिक हेल्थ सेंटरच्या मान्यतेनुसार खाजगी पद्धतीचे अद्ययावत असे बांधकाम केले जाणार आहे. ज्यात 20 खाटांचा अतिदक्षता विभाग, 32 बेडचे नवजात बालक उपचार कक्ष आणि मोठे 20 खाटांचे डायलेसिस युनिट रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष यांचा समावेश असणार आहे.
अपघात विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्षही उभारला जाणार आहे. इमारतीत पाच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्षही बांधले जाणार आहेत. याशिवाय लॉड्री, पाककक्ष, क्ष-किरण कक्ष, चार लिफ्ट, दोन जिने, एक रॅम्प अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे.
रक्तपेढी ही लहान मुलांच्या कक्षात असून नव्या रक्तपेढीचे कार्यालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 68 लाख रुपयांचा निधी मंजूर काण्यात आला आहे. यानंतर जुनी इमारत पडली जाणार आहे.
सीआरझेडची परवानगी बांधकामासाठी आवश्यक होती. ती आता मिळाल्याने लवकरच रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
मीनाक्षी खाडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग रायगड