Shri Ram Varadayini Mata : महाबळेश्‍वर मार्गावरील श्री राम वरदायिनी माता

प्रतापगडाच्या पायथ्याशी वृक्षवल्लींनी वेढलेल्या गावात पारनिवासिनी म्हणून विसावली
Shri Ram Varadayini Mata
महाबळेश्‍वर मार्गावरील श्री राम वरदायिनी माताpudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर ः समीर बुटाला

घनदाट अरण्याने वेढलेल्या जावळीच्या खोर्‍यातून महाराष्ट्राच्या पंचकन्या म्हणून ज्या नद्या ओळखल्या जातात त्यातील एक कोयना आहे. याच कोयनेच्या तीरावर जी मंदिरे आहेत त्यात श्रीरामवरदायिनी असे सुंदर नाव असलेली आदिशक्ती महाबळेश्वरजवळ पारसोंड किंवा पार (जि. सातारा) या प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या आणि वृक्षवल्लींनी वेढलेल्या गावी पारनिवासिनी म्हणून विसावली आहे.

श्रीआदिशक्ती श्रीरामवरदायिनी देवस्थान हे महाराष्ट्रातल्या जागृत दैवतांपैकी एक समजले जाते. श्रीक्षेत्र पार्वतीपूर म्हणून पार या गावाचा उल्लेख अनेक पुरातन कागदपत्रांमध्ये आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना वर देणारी म्हणून श्रीरामवरदायिनी अशी आख्यायिका या देवीबाबत सांगितली जाते.

रामवरदायिनीची स्थापना प्रभू श्रीरामांनी केल्याचे एकनाथ महाराजांनी त्यांच्या भावार्थ रामायणातील अरण्यकांड या भागात आणि श्रीधरस्वामींनी त्यांच्या रामविजय ग्रंथात सांगितले आहे. मंदिराच्या गाभार्‍यातली मुख्य दैवताची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे आज सांगितले जात असले, तरी पुरातन काळात खुद्द ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनीच मूळ वरदायिनी देवीची स्थापना केल्याची अख्यायिकाही आहे.

Shri Ram Varadayini Mata
Online gaming app fraud : ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप्सद्वारे कोट्यवधींची फसवणूक

सह्याद्रीच्या कुशीत दुर्गम जागी वसलेल्या या गावातून आपण या मंदिरात प्रवेश करताच सभोवतीचा निसर्ग आपले स्वागत करतो. मंदिराच्या गाभार्‍यात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत. डाव्या बाजूला असणारी सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती ‘श्री वरदायिनी’ या नावाने तर उजवीकडची सुमारे तीन फूट उंचीची मूर्ती ‘श्रीरामवरदायिनी’ या नावाने ओळखली जाते. श्रीरामवरदायिनीची जत्रा वर्षातून दोन वेळा भरते. वार्षिक यात्रोत्सव चैत्र वैद्य त्रयोदशी पासून सुरू होतो तो वैशाख शुद्ध षष्ठीपर्यंत सुरू असतो.

यात्रेच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच चैत्र अमावस्येला आसपासच्या गावांतले त्या त्या गावचे ग्रामदैवत गुढीच्या काठीच्या रूपात घेऊन या मंदिरात येतात. मुख्य सभामंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे, तिथे बगाड लावले जाते. यात्रेच्या शेवटच्या दिवशी छबिना असतो, तेव्हा मंदिरात लघुरूद्राभिषेक, होमहवन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Shri Ram Varadayini Mata
Raigad Ropeway: रायगड रोपवेवर थरारक प्रात्यक्षिक; पहा व्हिडिओ

पहाटे पाच वाजता देवीची मूर्ती पालखीत ठेवून पालखीची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. नवरात्रामध्ये मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा उत्सव उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो.

प्रतापगडावर जेव्हा मुघलांचे आक्रमण झाले होते तेव्हा गडावरील श्री भवानीमातेची मूर्ती याच मंदिरात ठेवल्याचेही सांगितले जाते. जावळीच्या खोर्‍यातल्या या मंदिराचे शांत-निवांत आवार आणि प्रसन् अशा श्रीरामवरदायिनीचे दर्शन घेताना आपले भान हरपून जाते.

ऐतिहासिक घराण्यांची कुलदेवता

प्रतापगडच्या पायथ्याला वसलेली श्रीरामवरदायिनी ही अनेक ऐतिहासिक घराण्यांची कुलदेवता असून तिची ठाणी सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातल्या गावांमध्येही आहेत. जय रघुवीर रामवरदायिनी शिरगाव (ता. खेड, जि. रत्नागिरी), श्री रामवरदायिनी दसपटी किंवा दादर (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), वर्धनीदेवी वर्धनगड (ता. खटाव, जि. सातारा), कालगाव-चिंचणी (ता. कराड, जि. सातारा), रामवरदायिनी खर्शी (ता. जावळी, जि. सातारा), वर्धनीदेवी चिंचणी (ता. जावळी, जि. सातारा), श्रीभवानी माता, प्रतापगड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा), वरदायिनी कोळदुर्ग पारघाट (ता. महाबळेश्वर. जि. सातारा) आणि कापडे (ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी ही ठिकाणे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news