अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्यासह एकूण 22 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या भोईर आणि त्यांच्या 21 साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हे प्रकरण 13 वर्षांपूर्वीचे असून, अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील कम्प्युटर सेंटर संचालिका रूपाली थळे, त्यांचे पती विजय थळे आणि त्यांच्या नातेवाईकांवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांनी 25 आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
या जुन्या खटल्याचा निकाल 13 वर्षांनंतर लागला. अलिबाग सत्र न्यायालयाने दिलीप भोईर यांच्यासह एकूण 22 जणांना दोषी ठरवले होते आणि त्यांना सात वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड ठोठावला होता. अलिबाग सत्र न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात दिलीप भोईर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर, दिलीप भोईर यांच्यासह अन्य सर्व 21 जणांना जामीन मंजूर केला आहे.