Tourist Safety Devkund
माणगाव : माणगाव तालुक्यातील भिरा धरणाच्या परिसरात वसलेला देवकुंड धबधबा हा कोकणातील एक अप्रतिम आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना मानला जातो. जंगलाच्या कुशीत लपलेला, पारदर्शक निळसर पाणी घेऊन बारमाही खाली कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत येथे झालेल्या काही दुर्दैवी अपघातांमुळे प्रशासन दरवर्षी पर्यटकांसाठी येथे प्रवेशबंदी घालत आहे. ही बंदी तात्पुरती कांही कालावधीसाठी असली तरी, त्याच दरम्यान पर्यटकांची कूच देवकुंड पर्यटन क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात असते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार मिळतो. ही समस्या कायमची संपवायची असेल तर बंदी नव्हे, तर सक्षम पर्यटक सुरक्षा व्यवस्था उभारणे ही काळाची गरज बनली आहे. देवकुंडला पर्यटन बंदी नको तर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था मजबूत करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी पर्यटकातून होत आहे.
भिरा ते देवकुंड पर्यंतचा सुमारे ४ किमीचा जंगल मार्ग हे येथील मोठे आव्हान ठरते. पावसाळ्यात हा मार्ग अधिकच निसरडा आणि धोकादायक होतो. अनेक वेळा योग्य मार्गदर्शन, माहिती व सुरक्षा नसल्यामुळे पर्यटक वाट चुकतात, अडकतात किंवा पाण्यात बुडून जीव गमावतात. अशा घटनांमुळे स्थानिक प्रशासन व वनविभाग पर्यटकांवर बंदी लादते, पण ही समस्या दूर करण्याचा हा मार्ग नव्हे असे पर्यटकातून बोलले जात आहे. भिरा-देवकुंड परिसरात संरक्षक गार्ड, स्थानिक मार्गदर्शक, प्राथमिक उपचार केंद्र, आपत्कालीन मदत केंद्र, जीपीएस ट्रॅकिंग, माहिती फलक, चेतावणी बोर्ड अशी मूलभूत सुरक्षा व्यवस्था उभारणे गरजेचे आहे.
स्थानिक युवकांनाही पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित करून रोजगाराची संधी देता येईल. तसेच पर्यटक नोंदणी प्रक्रिया सक्तीची करून प्रवेश नियंत्रित करता येईल. देवकुंड हा फक्त धबधबा नाही, तर रायगड जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाचा एक भाग आहे. दरवर्षी पावसाळ्यात देवकुंड परिसरात प्रशासनाकडून कलम १४४ लागू करून पर्यटकांना बंदी घातली जाते. येथील पर्यटन बंदीमुळे स्थानिक रोजगारावरही परिणाम झाला आहे.
पायाभूत सुविधा आणि योग्य नियोजनाच्या अभावा मुळेच या ठिकाणी अपघात घडतात. त्यामुळे बंदी ही उपाययोजना नसून, ती एक टाळाटाळ आहे. आज गरज आहे ती एक उत्तरदायित्वाने आखलेल्या सुरक्षित पर्यटन धोरणाची. जर सह्याद्रीच्या कुशीत असा निसर्गरम्य धबधबा लाभलेला असेल, तर त्याचे जतन आणि पर्यायाने सुरक्षित वापर करण्याचे भान पर्यटकांनी ठेवावे लागेल हे मात्र नक्की आहे.
या परिसरातील छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक, खानावळ, चहा टपरी व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक, मक्का व्यावसायिक, पर्यटकांच्या निवासाची सोय करणारे व्यावसायिक, परिसरातील पर्यटन स्थळाची माहिती देणारे गाईड या व्यावसायावर मोठ्या प्रमाणात परीणाम होत आहे.
भीरा गावचे हद्दीतील देवकुंड धबधबा व सणसवाडी गावचे हद्दीतील सिक्रेट पॉईंट व ताम्हाणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. हि ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वी या परिसरात अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडलेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासन दरवर्षी कलम १४४ या परिसरात लागू करते. ताम्हीणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जिवीत हानी होऊ शकते.