

उरण ः उरण तालुक्यात सुरू असलेली विकासकामे आणि येथे होत असलेले मातीचे भराव यामुळे उरणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळ झाली आहे. वाहनांच्या वाहतूकीमुळे ही धुळ हवेत उडून मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होत आहे. यावर उपाययोजना म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) परिसरात वाढत्या वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने ठोस, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
बंदर परिसरात सातत्याने सुरू असलेली मालवाहतूक, कंटेनर हाताळणी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळ यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीवर उपाययोजना म्हणून जेएनपीए प्रशासनाने वॉटर स्प्रिंकलर सिस्टीमचा व्यापक वापर सुरू केला आहे.
जेएनपीएच्या अंतर्गत रस्ते, कंटेनर यार्ड, गोदाम परिसर तसेच मालवाहतुकीच्या मुख्य मार्गावर नियमित अंतराने पाण्याचे फवारे मारले जात आहेत. यामुळे हवेत उडणारी धूळ जमिनीवर बसत असून, वायू प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळ्यात व कोरड्या हवामानात धूळ प्रदूषण अधिक तीव्र होत असल्याने ही उपाययोजना अधिक परिणामकारक ठरत आहे.
या उपक्रमाचा थेट फायदा जेएनपीए परिसरातील कार्यरत कर्मचारी, वाहनचालक तसेच आसपासच्या उरण तालुक्यातील नागरिकांना होत आहे. धूळ प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ व आरोग्यविषयक तक्रारी कमी झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण संतुलन राखत बंदर विकास साधण्याचा जेएनपीएचा संकल्प असून, भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आणखी प्रभावी उपाय राबविले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विकासासोबत पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधणे तसेच आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकालीन लाभदायक असणारा उपक्रम राबवण्याचा आदर्श परिसरात निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू केलेल्या वॉटर स्प्रिंकलर सिस्टीममुळे जेएनपीए परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारत असून, आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम दीर्घकालीन लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सिडकोने देखिल अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
यांत्रिक स्वीपिंग मशिन्सचा वापर
केवळ पाण्याच्या फवाऱ्यांपुरतेच न थांबता जेएनपीए प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हरित पट्टा वाढविणे, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, रस्त्यांची नियमित स्वच्छता, यांत्रिक स्वीपिंग मशिन्सचा वापर तसेच प्रदूषण नियंत्रण मानकांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात येत आहे. बंदर परिसरातील विविध टर्मिनल ऑपरेटर व कंत्राटदारांनाही प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस सूचना देण्यात आल्या आहेत.