Appasaheb Dharmadhikari | दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती...

कल्पवृक्षाची सावली...ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी
 Appasaheb Dharmadhikari
पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी.(Pudhari Photo)
Published on
Updated on
ऋषिता तावडे, अलिबाग

Shri Dattatreya Narayan alias Appasaheb Dharmadhikari

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यांतील रेवदंडा या गावी झाला. त्यांचा बुधवारी वाढदिवस. श्री सदस्यांच्या आयूष्यात कल्पवृक्षाची सावली ठरलेले पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बाबत एकत भावना सर्वांच्या मनात येते ती म्हणजे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती...त्यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने त्यांच्या अनन्यसाधारण कार्याचा घेतलेला वेध....

प्रेमस्वरुप, चिंतनशील, निश्चल, मितभाषी पण आध्यात्मिक जाणिवेतून प्रगल्भ असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी होय. देव, देश आणि धर्म यांची सांगड घालत राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती ही अंतःकरणातून केल्यानंतर ती निर्जीवातीलसजीवपण जागृत करते आणि सगुणाचं रुपांतर निर्गुणात करते ती खरी श्रद्धा होय. ही शिकवण आप्पासाहेब सातत्याने देत असतात. निरुपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वारसा आप्पासाहेबांना त्यांचे पिता नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून लाभला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले होते. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा माध्यमातून आप्पासाहेबांचे समाजोपयोगी कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाला परिचित आहे.

 Appasaheb Dharmadhikari
रायगड : आंबा नदीच्या पलीकडे अडकलेल्या ६ तरुणांना वाचविण्यात यश

आप्पासाहेब यांचं मन आणि आचरण हे आरशात दिसणारं खरंखुरं प्रतिबिंब आहे. त्यांच्या जीवनशैलीत व्यतीत होणारं असामान्य साधेपणा, अत्यंत साध्या राहणीतून प्रकट होणारा निःस्वार्थ भाव आणि आल्या-गेलेल्या प्रत्येकाचं अंतर्यामी मनानं, हास्य सुमनानं केलं जाणारं स्वागत म्हणजे कुटुंबियांचं रेवदंडा येथील घर हे प्रेमळ वातावरणानं ओथंबलेलं आहे. या घरात पाऊल टाकल्यानंतर आध्यात्मिक संवेदनांच्या जाणिवेतून शुचिर्भूत झाल्यासारखं प्रत्येकाला वाटतं. मानवता धर्माची शिकवण अंतरी रुजली की बाह्य भेदांवर सहजपणे मात होते आणि साहजिकच आपआपसात प्रेमभाव, जिव्हाळा, आपलेपणा हे उत्तमगुण जोपासले जातात.

 Appasaheb Dharmadhikari
नारायणगड किल्ला चकाचक; रायगड परिवाराने राबवली स्वच्छता मोहीम

संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील लाखो श्रीसदस्य अपार मेहनत घेत असतात. यातून अनेक भागांचा चेहरामोहराच पार बदलून टाकला जातो आणि शहर, गावेही चकाचक होत असतात. त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरुच आहे. तसेच त्यांनी मानवी मनाची मशागत करतानाच स्वच्छ समाजाची निर्मिती करण्याचा ध्यास घेतला आहे, ही बाब मानवकल्याणकारी आहे. श्री सदस्य राज्यात ठिकठिकाणी वृक्षलागवड करत आहेत. या मोहीमेच्या माध्यमातून अनेक परिसर हिरवाईने नटलेले आहेत. कोट्यवधी रोपांची लागवड करून त्यांचे जतन करण्याचे काम श्री सदस्य करत आहेत. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी मोठे काम केले. अंधश्रध्दा निर्मुलनासारखे महान कार्य डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी, कुटुंबिय आणि श्री सदस्य करीत आहेत. व्यसनमुक्तीसारखा उपक्रम राबवून आप्पासाहेबांनी अनेक महिलांचे भगिनींचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले आहेत.

 Appasaheb Dharmadhikari
Alibag Hapus Mango | अलिबागच्या हापूस पेटीला आठ हजारांचा भाव

वृक्षारोपण उपक्रम

पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर आप्पासाहेबांनी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे. सध्या सर्वत्र भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर विहिरी तसेच तलाव व इतर जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम राबविली. तसेच अनेक समाजोपयोगी महान कार्य त्यांच्या हातून झालेले आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे त्यांची संपुर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. व्यसनमुक्तीसाठी आप्पासाहेबांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रात त्यांची ‘स्वच्छतादूत’ म्हणून ओळख झाली आहे.

व्यसनाधिनता, परस्पर द्वेष संपवून सामाजिक ऐक्य आणि देशभक्ती अधिक व्यापक व्हावी यासाठी समाजाला संत विचारसरणी आणि शिकवणूकीमध्ये उभे करुन देशाला बळकटी आणण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून एक विलक्षण सुधारणावादी चमत्कार देशवासीय पाहत आहेत. डॉ. आप्पासाहेब व त्यांचे तीन प्रमुख आधारस्तंभांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आता अनेक सामाजिक उपक्रम व्यावकपणे राबविले जात आहेत. वृक्षारोपण, पाण्याचे स्त्रोत, ग्रामस्वच्छता, वन्यजीव संरक्षण, स्वयंरोजगार, व्यवसाय मार्गदर्शन होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग मतीमंद व्यक्‍तींना मदत नेत्रदान, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले नवी मुंबईतील महाआरोग्य शिबिर, युपीएसी, एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन शिबीरे असे अभियान डॉ. आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन शहर व ग्रामिण भागात यशस्वी करण्यात डॉ.आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले आहे.

विविध पुरस्काराने गौरव

गुणवत्ता व शिस्तीशी कोणतीही तडजोड न करणारे आदरणीय आप्पासाहेब प्रसिद्धी विमुख समाज मार्गदर्शक आहेत. यामुळेच त्यांचे महान असे अतिमानवीय कार्य निष्कलंपणे उभे आहे. प्रतिष्ठानला कल्पकता आणि सुयोग्य नियोजनासाठी झटणारे सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहूलदादा धर्माधिकारी हे तीन प्रमुख आधारस्तंभ रात्रं-दिवस झटत असतात. आदरणीय आप्पासाहेब निरपेक्ष वृत्तीतून समाजप्रबोधनातून अविरत समाजसेवा करण्याचे जीवनव्रत स्वीकारले आहे. म्हणून भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि विविध संस्थांनी त्यांच्या कार्याची विशेष नोंद घेऊन त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे.

पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी
पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी(Pudhari Photo)

स्वच्छतादूत म्हणून राज्य सरकारने त्यांचा विशेष गौरव केलाय. तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठाने ‘डी लिट’ पदवी प्रदान करुन गौरव केलाय. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022’ हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून सन्मान सोहळा 16 एप्रिल 2022 या दिवशी खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा अविस्मरणीय सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीगण, सचिन धर्माधिकारी या वेळी उपस्थित होते.

देव या संकल्पनेत आपण बहुतांश मंडळी जोडली गेलेली पाहतो. देवाची भक्ती, पूजा अर्चा, प्रार्थना केल्याने देवकृपा होते, आपण सुखी होतो आणि आपले कल्याण होते अशी भाबडी समजूत करून आपण मार्गक्रमण करीत असतो. पण केवळ पूजा-अर्चा, भजन-कीर्तन यावर थांबू नका, तर माणसामाणसात देवत्व पहा. निसर्गाशी नाते जोडा. स्वच्छतेची कास धरा, एकमेकां साह्य करण्याची भूमिका ठेवा. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, संकटात सापडलेल्याला आधार द्या, अशी वैचारिक क्रांती फुलविणारे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना परमेश्वर दीर्घायुष्य आणि सद्विचारांच्या लढाईसाठी मोठे बळ देवो, एवढीच प्रार्थना!

आप्पासाहेब म्हणतात की, माणूस चालत असताना त्याला रस्त्यात चिखल अथवा घाण दिसल्यास तो ती चुकवून पुढे चालत रहातो म्हणूनच केवळ देव देव करुन, जपमाळ ओढून चालणार नाही. उपासनेबरोबरच आपल्या गावातील शाळा, रुग्णालय, स्वच्छतागृहेदेखील स्वच्छ असली पाहिजेत कारण ही सगळीच ठिकाणं सामाजिक मंदिरं आहेत. आणि आपण मंदिर म्हटलं म्हणजे आर्ंतबाह्य निर्मळ स्वच्छ्ता हवी. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता हवी. याच विचारातून आम्ही नाते आणि पाचाड या गावी सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पुर्ण करु शकलो.

तिर्थरुप आप्पासाहेबांचा सहवास हा ज्ञानवंताचा, प्रतिभावंताचा आणि उत्तम मनुष्य निर्माण करणार्या आध्यात्मिक निरुपणाचा ओसंडता प्रवाह आहे. या ज्ञानरुपी झर्‍यातून आपण घेवू तेवढं अमृत कमीच आहे. म्हणून हा निरुपणाचा अढळ ध्रुव भविष्यात शतायुषी होवो हिच श्री सदगुरु चरणी मनोभावे प्रार्थना...!

श्रवणसंस्कार घडवायचे तर ते एका दिवसाचे काम नाही. काही विशिष्ट कालावधीपुरते सुद्धा हे कार्य मर्यादित ठेवता येत नाही. हे अखंडपणे चालले पाहिजे. म्हणून श्रवणातून संस्कार कायमस्वरूपी व्यवस्था असली पाहिजे. ही व्यवस्था म्हणजेच श्री समर्थ बैठक दर आठवड्यात ठरलेल्या निश्चित वारी व वेळेत सर्व श्री सदस्य एकत्र येत श्रवण करतात. यालाच ‘श्री समर्थ बैठक’ म्हटले जाते.

श्रीसमर्थ म्हणतात की, प्रत्येकाने या निराकाराबाबत शुद्ध भक्तिभाव अंतरंगापासून निथयात्मक भूमिकेतून धरला पाहिजे. जरी अंतरी संशय असेल, तर दृष्टीला भेट भासेल. पण जर निराकाराप्रती समर्पण असेल. तर जो कृपाळू राघव आहे तोच पांडुरंगाच्या रूपाने कृपा करण्यासाठी प्रत्यक्ष तेथे आहे.

‘परमार्थ सकळांस विसावा सिद्ध साधूमहानुभवा । सेखी सात्विक जडजीवा। संतसंगे करुनी॥ ”भल्याने परमार्थी भरावे। शरीर सार्थक करावे । पूर्वजांस उद्धरावे। हरीभक्ती करुनी॥

याचा अर्थ, परमार्थ हा स्त्री-पुरुष, आबालवृद्ध सर्वांसाठी आहे. हे स्मरण ठेवून, लहान मुले, स्त्रिया, पुरुष साक्षर, निरक्षर, सर्वासाठी ठिकठिकाणी, सातही वारी बैठका सुरू ठेवल्या आहेत. ज्याच्या त्याच्या सवडीनुसार केवळ साक्षरच नव्हे, तर निरक्षर माणसालाही उपासनेची संधी मिळावी या उद्दात्त हेतूने प्रोढ साक्षरता वर्गही विनामूल्य चालू ठेवले आहेत. निरुपणातून अज्ञान नष्ट झाले की ज्याचे त्याला वाटू कळू लागते. प्रत्येक श्री सदस्याला आपले हित कळते. म्हणून प्रत्येकाने ही शिस्त स्वेच्छेने आणि आनंदाने स्वीकारली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news