

पोलादपूर ः किल्ले प्रतापगडावर उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला असून किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचा दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भावीक, शिवभक्त उपस्थित राहत आहे. प्रतापगडावरील मंदिरात दोन घट बसवले जातात. हे या घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य असून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दुसरा छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असतो. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.
नवरात्रौत्सव काळात भवानी माता मंदिरामध्ये व प्रतापगडावर विविध कार्यक्रम साजरे होतात. यावर्षी देखील भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यता 27 सप्टेंबर रोजी शनिवारी मशाल महोत्सव उत्साहात साजरा होणार असून 366 मशालिंनी किल्ले प्रतापगड उजळून निघणार आहे. लाखो भावीक यावेळी उपस्थित राहणार आहेत.
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणार्या तुळजापूर वासिनी भवानी मातेचे प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगड येथे सन 1661 साली स्थापन केले. प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिराला साडेतीनशे वर्ष सन 2010 रोजी पूर्ण झाली या निमित्ताने कट्टर शिवभक्त व शिवकालीन खेडे गावचे संस्थापक आप्पासाहेब उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशे मशाली प्रज्वलित करून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव सुरू करण्यात आला.
यंदा या मशाल महोत्सवाचे पंधरावें वर्ष असून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाची जय्यत तयारी चालू आहे त्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावरील संपूर्ण तटबंदी प्रतापगड वन समिती द्वारे स्वच्छ करण्यात आली आहे शिवप्रताप बुरुज ते प्रतापगड भवानी माता मंदिर हा परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला आहे तसेच मशाल महोत्सवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आत्ताच प्रतापगड मशाल महोत्सव समितीने कंबर कसली असून किल्ले प्रतापगडावर भोजनासाठी साहित्य रवांना करण्यात आले आहे तसेच शिवभक्तांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवकालीन खेडेगावात मशाली बांधण्याचे काम चालू असून यासाठी लागणारे गोड तेल रॉकेल याचा पुरवठा शिवभक्त स्वतः करत आहेत. फटाक्यांच्या आतिषबाजी केली जाते हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त किल्ले प्रतापगडावर उपस्थित असतात. ललीत पंचमीच्या दिवशी सकाळी शिवकालाची आठवण करून देणारा पालखी उत्सव साजरा होतो मावल्याच्या वेशात छत्र, चामरे, राजदंड, इत्यादि आयुधे घेवून भवानी माता मंदिर ते छत्रपति शिवाजी महाराज मूर्ति पर्यन्त हा पालखी सोहळा अवर्णानिय होतो. या संपूर्ण कार्यक्रमाचे जय्यत तयारी झाली असून या कार्यक्रमासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रतापगड मशाल महोत्सव समितीचे प्रमुख आप्पासाहेब उतेकर यांनी बोलताना दिली.