

panvel news
पनवेल : विक्रम बाबर
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे एका अनधिकृत पार्किंग केलेल्या फॉर्च्युनर कारमध्ये पिस्तुल तसेच संशयित व्यक्तीची ड्रायव्हिंग लायसन्स सापडली. शनिवारी रात्री या प्रकरणी डुप्लिकेट नंबर वापरणाऱ्या संशयित चालकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी खांदेश्वर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घटना कशी उलगडली?
मंगळवारी (दि. २) सायंकाळी सुमारे ८.३० वाजता पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलिस हवालदार येळे, पोलिस हवालदार मुलाणी आणि पोलिस नाईक निकम हे नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी स्टेशन परिसरात पार्किंग करण्यात आलेली फॉर्च्युनर (क्रमांक MH 03 AH 7863) ही गाडी वाहतूक व्यवस्थेला अडथळा ठरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाडीवरील नमूद नंबरच्या मालकाला संपर्क साधला असता, “सदर वाहन माझे नसून अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीचा नंबर वापरत आहे. याबाबत मी वेळोवेळी तक्रारही दिलेली आहे,” अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला.
वाहनाची तपासणी केली असता समोरील दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. तपासणीदरम्यान वाहनाच्या आत पिस्तुलासारखे शस्त्र आढळले. तसेच वाहनातून राजेंद्र निकम या नावाचे ड्रायव्हिंग लायसन मिळाले. कोर्ट चेकर अॅपमधून पडताळणी केली असता संबंधित व्यक्तीवर मुंबई विभागात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर अधिक अंमलदारांना घटनास्थळी बोलावण्यात आले. काही वेळातच राजेंद्र निकम (वय ४८ वर्षे, रा. चुनाभट्टी, मुंबई) हा स्वतःच घटनास्थळी आला. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन फॉर्च्युनर कारसह खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सोपविण्यात आले.