Khed Road Potholes Scam: खेड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्डे भरण्याचे फसवे रेकॉर्ड!

पावसाळ्यापूर्वी प्रशासनाला अर्थपुर्ण झोप
Khed Road Potholes Scam
Khed Road Potholes ScamPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यात खड्डे भरण्याचा कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी ठेकेदार लाखो रुपये घेतात. बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्तीचे दावे होतात. तसे 'बंडल' रेकॉर्ड करण्यासाठी ठेकेदारांकडून माया गोळा केली जाते. रस्त्याची अवस्था मात्र कागदावर गुळगुळीत आणि प्रत्यक्षात जीवघेणे खराबच! अशी स्थिती खेड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या प्रमुख जिल्हा मार्गांवर आहे.

ही भयानक फसवणूक सध्या सुरू आहे. मे महिन्यात व्हिडिओ बनवूनही अनेक रस्त्यांवर खड्डे तसेच आहेत. पावसाळा आला की पुन्हा "पाऊस पडला, खड्डे पडले" असे नाटक रचले जाईल.अशाच प्रकारे खेड तालुक्यातील अनेक प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्डे न भरताच दुरुस्तीचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

Khed Road Potholes Scam
Pune Acid Attack: प्रेमप्रकरणातून तरुणीसह मित्रावर ॲसिड हल्ला; तरुणी 45 टक्के भाजली

ठेकेदाराने काम केल्याचे कागदोपत्री दाखवले जाते, पैसे वाटप होतात, पण रस्त्यावर मात्र खड्ड्यांचे जीवघेणे आणि विदारक दृश्य कायम आहे. पावसाळ्यात हेच खड्डे अधिक खोल होतात आणि मग पुन्हा नवीन निधी मागण्यासाठी प्रशासन तयार होते. ही साखळी वर्षानुवर्षे चालू आहे.

एका सामाजिक कार्यकर्त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, "इच्छा असूनही आणि निधी असूनही आम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांवर निधी टाकता येत नाही. ही अडचण आहे." मात्र ही अडचण का? जबाबदारी कोणाची? सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव की मुद्दाम केलेले दुर्लक्ष? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Khed Road Potholes Scam
Wildlife Water Crisis: कडक उन्हाळा... पशू-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात!

ही केवळ रस्त्यांची समस्या नाही, तर भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाची समस्या आहे. नागरिक रोज जीव मुठीत धरून या खड्ड्यातून वाहन चालवत आहेत. दुचाकीस्वार, महिलांचे अपघात, वाहनांचे नुकसान... याला जबाबदार कोण? मे महिन्यात सुद्धा रस्ते दुरुस्त न करणारे अधिकारी आणि ठेकेदार पावसाळ्यात काय करणार आहेत? फक्त तक्रारींचे ढीग गोळा करायचे आणि निधी मागायचा? असा प्रयत्न केला जात आहे.

सध्याची परिस्थिती पाहता खेड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्गांची अवस्था रस्त्यापेक्षा खड्ड्यांचा मार्ग अशी झाली आहे. पावसाळ्यात तक्रार करून काही उपयोग नाही, कारण आधीच काम झाल्याचे खोटे रेकॉर्ड तयार केले गेले आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील प्रमुख जिल्हा मार्ग तात्काळ तपासावेत. खड्डे भरले आहेत की फक्त कागदावर? आत्ताच खात्री करून घेतली पाहिजे. त्यावर आवाज उठवला पाहिजे, बैठका आणि पत्रव्यवहारापेक्षा आता प्रत्यक्ष फोटो-व्हिडिओ आणि त्याद्वारे तक्रारी केल्या पाहिजेत.

सडलेल्या व्यवस्थेला जागेवर आणण्यासाठी काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.प्रशासन जागे होईल की आणखी एक पावसाळा खड्ड्यांमध्ये बुडवून टाकणार? असे बोलले जात आहे. खेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी आणि दोषी अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करावी, अन्यथा ही फसवणूक चालूच राहील.

सडलेल्या व्यवस्थेला झणझणीत उत्तर देण्याची वेळ आली असून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अशा रस्त्याच्या तक्रारी केल्या पाहिजेत

-शरद बुट्टे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news