

Congress role in Mahad politics
महाड ः महाड नगर परिषदेच्या स्वातंत्र्योत्तर काळातील निवडणुकांमध्ये यावर्षी प्रथमच काँग्रेस पक्ष सहभागी होणार किंवा कसे असे संकेत प्राप्त होत आहेत. मागील तीन - साडेतीन वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये महाड मधील काँग्रेस पक्षाचे असलेले अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आले असल्याचे बोलले जात आहे. शहर व तालुक्यामध्ये पक्षाच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरीही आगामी नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर या निवडणुका लढवणार किंवा कसे याकडे तमाम राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाडमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी पक्ष व काँग्रेस या मध्ये 1990 सालापर्यंत थेट लढत झाल्याचे पहावयास मिळाले होते . मात्र त्या पक्षात या ठिकाणी झालेला शिवसेनेचा उदय व त्यानंतरच्या काळात भारतीय जनता पक्ष व मागील चार वर्षात राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडीने केलेला बदलाच्या पार्श्वभूमीवर महाड मधील काँग्रेस पक्षाचे अस्तित्व केवळ कागदावर राहिल्याचे बोलले जात आहे.
शंभर वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी पाळीमुळे ग्रामीण भागात आजही असल्याचे अनेक ठिकाणी अनुभवास येते मात्र मागील काही वर्षातील या पक्षाचा असलेला राजकीय प्रवास पाहता आगामी निवडणुकांमध्ये हा पक्ष किती ताकतीने या निवडणुका लढवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर शतकोत्तर वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या या सध्याच्या स्थितीमुळे महाड सह दक्षिण रायगड मधील पक्ष नेतृत्व पक्षाच्या वाढीकरता व आगामी निवडणुकांकरता कोणती रणनीती अवलंबणार आहे याबाबत राजकीय जाणकारांसह या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिल्याचे या संदर्भात केलेल्या विविध ठिकाणच्या चौकशी दरम्यान निदर्शनास आले.