

महाड ःमागील दशकात संपूर्ण जगात मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. परंतु या सर्रास डिजिटल प्रवाहाचा तरुण पिढीवर होणारा परिणाम गंभीर असून समाज व शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे. लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांची दैनंदिन जीवनशैली मोबाईलशी निगडित झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, या वापरामुळे पुस्तके, अभ्यास, शारीरिक खेळ आणि सामाजिक कौशल्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या संदर्भात समाजातील शिक्षण प्रेमींनी स्पष्टपणे सांगितले की, मोबाईलचा अतिरेक लहान मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, मानसिक तणाव, सोशल आयसोलेशन तसेच शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडवतो. ‘मोबाईल ही सोय आहे, गरज होऊ नये,‘ अशी जाणीव पालक व शिक्षकांमध्ये निर्माण होणे अत्यावश्यक आहे, असे मत व्यक्त होत आहे.
कुटुंबातील वातावरणही या समस्येला पूरक ठरत आहे. आजकाल पालकही मोबाईलवर सतत लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे मुलांमध्ये मोबाईलची सवय लवकर तयार होते. अनेक वेळा मुलांना मनोरंजनासाठी किंवा अभ्यासात मदत म्हणून मोबाईल दिला जातो; परंतु त्याचा अतिरेकी वापर ही मोठी समस्या बनत आहे.
शाळा व महाविद्यालयांनी या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक वर्गातून केले जात आहे.. विशेषतः दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवणे आणि पुस्तके, अभ्यास, क्रीडांगण आणि इतर शैक्षणिक व शारीरिक उपक्रमांकडे लक्ष देण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. काही शाळा यासाठी मोबाईल बंद करण्याच्या तासांचे नियम लागू करत आहेत, काही शाळा विद्यार्थ्यांना डिजिटल तासांचे मर्यादित प्रमाण देत आहेत.
पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. सामाजिक तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांना ठराविक वेळा मोबाईल वापरण्याची सवय लावून द्यावी, घरातील डिजिटल वर्तनाची योग्य उदाहरणे घालावी, तसेच मुलांना पुस्तक व खेळांसाठी प्रोत्साहित करावे. ‘मोबाईलचा योग्य वापर आणि मर्यादा ठरवणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे असे मानले जाते.
शालेय स्तरावर योग्य नियम व मार्गदर्शन न ठेवले तर मोबाईलच्या अतिरेकामुळे एकाग्रता कमी होणे, मानसिक तणाव वाढणे, सामाजिक संवादात कमी येणे आणि शारीरिक आरोग्य बिघडणे यासारख्या समस्या उद्भवतात. परिणामी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आणि खेळामध्ये सहभाग यावरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
यासंदर्भात सेवानिवृत्त शालेय अधिकाऱ्यांचे मत आहे की, मोबाईल हे केवळ साधन आहे, गरज नसावी; शाळा आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत संतुलन आणले पाहिजे. योग्य बंधने, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यांद्वारे तरुण पिढी शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्ट्या सुदृढ होऊ शकते, असे परखड मत सेवानिवृत्त शिक्षक व ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.