

अलिबाग : थंडीचा मोसम सुरु झाला असल्याने जिभेचे चोचले वाढले आहेत. कडाक्याच्या थंडीत चमचमित, सामिष मत्स्यहार करण्याची मजा औरच असते. त्यात समिंदराच्या परिसरात वास्तव्य असेल तर दररोजच्या भोजनात मत्स्यहार हा हवाच. पण नवीन हंगाम सुरू होऊन चार महिने लोटले तरी अद्याप कोळ्याची टोपरी ताज्या माशांनी काही भरलेली दिसलीच नाही.
बदलत्या हवामानामुळे माशांची आवक घटू लागल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊ लाला आहे. खोल समुद्रात मासेमारी करायला जाऊनही अपेक्षित मासे जाळ्यात सापडत नसल्यान मच्छिमारांना मासेमारी करावा लागणारा खर्चही न परवडणारा ठरू लागला आहे.
मत्स्य उत्पादन घटण्यामागे हवामानातील बदल, परराज्यातील मासेमारी बोटींची राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी, कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळाचे वाढलेले प्रमाण, रासायनिक उद्योगामुळे कोकण किनारपट्टीवर वाढलेले प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी, माशांच्या प्रजननकाळात होणारी मासेमारी, अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत.
सध्या रायगडच्या मच्छिबाजारात बांगडा, सुरमई, कोळंबी, पापलेट, चिंबोरी, खेकडा आदींची आवक होत आहे. मात्र त्यांचेही प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे दरही वाढलेले असतात. सध्या बाजारात बांगडा ८० ते १०० रुपये, सुरमई ३५० ते ४०० रुपये, पापलेट ४०० ते ५०० रुपये अशा दराने विकली जात आहे. मात्र हे मासे आकारान लहान असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसते.
त्यात सध्या मार्गशीर्ष मास सुरु झालाय. या महिन्यात मत्स्यहार करणाऱ्यांची संख्याही कमी असते. त्यामुळे अनेकदा माल येऊनही अपेक्षित उठाव होत नसल्याने मच्छी विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे.
घोळ, करंदी बगा झाले दुर्मिळ
पूर्वी किनारपट्टीवरील भागात घोळ, करंदी, बगा यासारखे मासे मुबलक प्रमाणात आढळायचे. आता हे मासे खूप दुर्मिळ झाले आहेत. बॉबीलदेखील पूर्वीच्या प्रमाणात कमी मिळत आहेत. खाडीपट्ट्यातील अनेक मत्स्यप्रजाती आता नष्टच झाल्या आहेत, अशी तक्रार मच्छीमार करत आहेत.