पनवेल : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या परिघातील खारघर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत शेकडो संशयित बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हाईड पार्क सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या या महिलांकडे ओळखपत्र किंवा भारतीय नागरिकत्वाचे पुरावे नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हाईड पार्कसह परिसरातील इतर सोसायट्यांमध्येही गेल्या काही महिन्यांपासून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुधवारी अचानक कारवाई केली. या कारवाईदरम्यान शेकडो महिलांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत.
या महिलांनी घरकाम, केअरटेकर, साफसफाई इत्यादी कामांच्या माध्यमातून खारघर व आसपासच्या परिसरात वास्तव्य केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, दलालांच्या माध्यमातून बेकायदेशीर मागनि या महिलांची राहण्याची व नोकरीची व्यवस्था करण्यात आली असावी.
खारघरमध्ये यापूर्वीही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांचा ठावठिकाणा लावून पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बांगलादेशी घुसख ोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सोसायट्यांमध्ये खाजगी नोकरीच्या माध्यमातून घुसखोरी वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सध्या ताब्यात घेतलेल्या सर्व महिलांची नागरिकत्व पडताळणी व पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू असून, बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केल्याचे सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या मोठ्या कारवाईनंतर खारघर परिसरातील रहिवाशांमध्ये सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. घरकाम करणारे किंवा इतर कामगार नियुक्त करताना त्यांची ओळखपत्रे तपासण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हाईड पार्क सोसायटी, खारघर नवी मुंबई येथे तब्बल १०२ संशयित बांगलादेशी मोलकरीण वास्तव्य करत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या महिलांचा धर्म मुस्लिम असून, त्यांच्या कायमच्या पत्त्यासाठी पश्चिम बंगालचे दस्तऐवज सादर करण्यात आले आहेत. मात्र, या कागदपत्रांची सत्यता संशयास्पद असल्याने त्यांची तपासणी करण्याची आम्ही नवी मुंबई पोलिस व पनवेल महानगरपालिकेकडे तातडीने मागणी केली आहे.
किरीट सोमय्या, वरिष्ठ भाजप नेते