

माणगाव : कोकणातील वातावरणात सध्या पावसाळ्याच्या आगमनाची स्पष्ट चाहूल लागली असून निसर्गानेही त्याची रंगतदार झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असला तरी सायंकाळ होताच आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत आहे. थंडगार वाऱ्याच्या झुळका, ढगांच्या विविध आकारांची रचना आणि क्षितिजावर मावळणाऱ्या सूर्याची सोनेरी किरणे यांचा अनोखा संगम परिसरातील नागरिकांना मोहिनी घालत आहे.
गेल्या काही दिवसांपासून माणगाव परिसरात सायंकाळच्या वेळी आकाशाचे रूप सातत्याने बदलताना दिसत आहे. कधी गडद काळ्या ढगांनी आकाश व्यापून टाकलेले असते, तर कधी सूर्यास्ताच्या वेळी ढगांमधून झिरपणाऱ्या सोनेरी, केशरी आणि लालसर किरणांची उधळण संपूर्ण परिसराला अलौकिक सौंदर्य प्रदान करत आहे.
दुसरीकडे, शेतकरी वर्गही मान्सूनच्या प्रतीक्षेत असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग देत आहे. शेत जमिनींची मशागत, बियाण्यांची खरेदी आणि इतर कृषी कामांची लगबग सुरू झाली आहे. वातावरणातील वाढता गारवा, आकाशातील ढगांची वाढती वर्दळ आणि सायंकाळी निर्माण होणारी दमट हवा यामुळे लवकरच मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याच्या आगमना पूर्वी निसर्गाने साकारलेले हे मनमोहक रूप नागरिकांना आनंद देणारे ठरत असून, सूर्यास्ताच्या मोहक रंग छटांनी आणि निसर्गाच्या या अद्भुत आविष्काराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याची ही पर्वणी आगामी पावसाळ्याच्या स्वागताचीच जणू एक सुंदर नांदी ठरत आहे.
निसर्गरम्य सूर्यास्ताचे चित्र कॅमेऱ्यात कैद
हिरव्यागार झाडांमधून, बांबूच्या बनातून आणि दूरवर पसरलेल्या डोंगररांगां मधून दिसणारे हे नयनरम्य दृश्य निसर्ग प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी गावा बाहेरील डोंगरमाथे, माळराने आणि जंगल परिसरात या देखण्या सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अनेक हौशी छायाचित्रकार आणि युवक-युवती या निसर्ग सौंदर्याचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही या रम्य दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.