

pilot project CISF hybrid port security model
रायगड- भारताच्या बंदर सुरक्षेला नवा बळकटी देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) खासगी सुरक्षा रक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) आणि चेन्नई पोर्ट अथॉरिटी (CHPA) येथे एकाच वेळी सुरू झाला. या कार्यक्रमाचा उद्देश खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची कौशल्य, क्षमता वाढवणे, सर्व बंदरांवर समान सुरक्षा प्रोटोकॉल लागू करणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन सुनिश्चित करणे हा आहे.
भारतामध्ये २०० पेक्षा जास्त छोटे-मोठे बंदरे आहेत. CISF सर्व १३ मोठ्या बंदरांची सुरक्षा सांभाळते, तर लहान बंदरांवर खासगी रक्षक काम करतात. त्यामुळे सुरक्षेतील एकसंधता राखण्यासाठी हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सर्व बंदरांवर एकसमान आणि मानकीकृत सुरक्षा प्रोटोकॉल विकसित करण्याची गरज लक्षात घेऊन, बंदर प्राधिकरण, सीमा शुल्क विभाग, शिपिंग कंपन्या, मालवाहतूक एजंट्स इत्यादी संबंधित घटकांशी सल्लामसलत करून हा प्रशिक्षण कार्यक्रम पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन आठवड्यांचा अभ्यासक्रम
या दोन आठवड्यांच्या "बंदर-सुविधा सुरक्षा अभ्यासक्रमात" सुरक्षारक्षकांना –
बंदरांमधील कार्यपद्धती
धोके ओळखणे
आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद
तांत्रिक सुरक्षा उपकरणांचा वापर
आंतरराष्ट्रीय ISPS कोडचे नियम
याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. अभ्यासक्रमात कायदेशीर चौकट, तांत्रिक सुरक्षा उपकरणांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय जहाज व बंदर-सुविधा सुरक्षा (ISPS) कोड अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांचा समावेश आहे.
सुरक्षा नियम व प्रक्रियांच्या अंमलबजावणीत एकसंधता राखण्यासाठी संरचित प्रशिक्षण मॉड्यूल्स विकसित करण्यात आले आहेत. सीआयएसएफ, सीमा शुल्क, समुद्री विभाग आणि पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रशिक्षक हे कार्यक्रम चालवतात. यामध्ये प्रत्यक्ष सरावाचाही समाविष्ट आहे.
पहिल्या टप्प्यात, जेएनपीए शेवा, डीपीए कांडला आणि एमपीए मुंबई या तीन प्रमुख बंदरांतील ४० खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जेएनपीए प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे नावनोंदणी केली आहे. तसेच न्यू मंगळुरू पोर्ट अथॉरिटी (NMPA), कामराजर पोर्ट लिमिटेड (KPL) एन्नोर, चेन्नई पोर्ट अथॉरिटी (CHPA) आणि वी.ओ. चिदंबरनार पोर्ट अथॉरिटी (VOCPA) तूतीकोरिन येथील २६ खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी CHPA प्रशिक्षण केंद्र, चेन्नई येथे नावनोंदणी केली आहे. सीआयएसएफ पुढील महिन्यांत दोन्ही किनाऱ्यांवरील इतर बंदरांपर्यंत हा अभ्यासक्रम विस्तारण्याची योजना आखत आहे.
पी. एस. रणपिसे, अतिरिक्त महासंचालक (दक्षिण) यांनी सांगितले, "ही उपक्रम भारताच्या हायब्रिड बंदर सुरक्षा मॉडेलला बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल, सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये एकसंधता येईल आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे सुनिश्चित होईल."
CHPA, चेन्नई येथे उद्घाटन सत्रात चेन्नई पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष सुनील पालीवाल यांनी सांगितले, "या अभ्यासक्रमाची सुरुवात बंदर सुरक्षा व्यवस्थापनात एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. श्री सरवनन, महानिरीक्षक सीआयएसएफ, दक्षिण विभाग मुख्यालय यांनी सांगितले -बंदरांच्या गुंतागुंतीच्या वातावरणानुसार केंद्रित प्रशिक्षण देऊन, आम्ही सुरक्षा कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेसह त्यांच्या कर्तव्यांचे पालन करण्यासाठी सक्षम करत आहोत.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा प्रशिक्षण उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे केंद्रित प्रशिक्षण भविष्यातील संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.