

रोहे : कोकणातील गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे! चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान दोन विशेष अनारक्षित गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०११६० ही अनारक्षित विशेष गाडी ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०५ वाजता चिपळूण येथून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ४:१० वाजता पनवेलला पोहोचेल. तर ०११५९ या गाडी क्रमांकाची गाडी ४ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल येथून संध्याकाळी ४:४० वाजता सुटून रात्री ९:५५ वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांना सोमटने, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कलंबणी बुद्रुक, खेड आणि आंजणी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाड्या अनारक्षित (Unreserved) स्वरूपात चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे, प्रवासी युटीएस (UTS) ॲप वापरून किंवा थेट रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीतून तिकिटे काढू शकता. या तिकिटांसाठी सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस गाड्यांना लागू होणारेच सामान्य भाडे आकारले जाईल.
या विशेष गाड्यांमुळे गणेश भक्तांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपशील आणि माहितीसाठी प्रवासी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट देऊ शकतात किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करू शकता, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने करण्यात आले आहे.