

पनवेल शहर: सिडको आणि महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका हाकळंबोलीतील तब्बल १००० निवासी संकुल असलेल्या गृहनिर्माण संकुलाला दररोज बसत आहे.
सिडको कडुन होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांना आता टँकरद्वारे तब्बल ५० हजार रुपयाचे दररोज पाणी खरेदी करून पुरवठा करावा लागत असल्याने त्याचा आर्थिक भार हि येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
वारंवार सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल्ल देवरे तसेच सत्ताधारी राजकीय लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटूनही कोणता ठोस तोडगा निघत नसल्याचा संताप या सोसायटीचे सचिव ॲड..अभिजीत धुमाळ यांनी बोलताना सांगितले आहे.
सेक्टर-१५ येथील हंसध्वनी गृहनिर्माण सहकारी गृहनिर्माण संस्था गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहे. मागील अडीच ते तीन महिन्यांपासून सिडकोकडून केवळ अत्यल्प दाबाने सुमारे ५० टक्के पाणीपुरवठा होत होता.
उपलब्ध पाण्याचे नियोजन करून सोसायटी प्रशासनाने सकाळी व संध्याकाळी प्रत्येक एक तास पाणीपुरवठा करून रहिवाशांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न केला. ११ जुलै २०२६ पासून सिडकोचा पाणीपुरवठा कमी प्रमाणात आणि कमी दाबाने झाल्याने संपूर्ण सोसायटीला खासगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
१००० सदनिका व दहा व्यावसायिक गाळे असून सुमारे ४५०० रहिवाशांना दररोज पाणी पुरवठ्यासाठी सुमारे ५०,००० खर्च करावा लागत आहे.हा आर्थिक भार सर्वसामान्य सभासदांना परवडणारा नाही. तसेच टँकरद्वारे मिळणाऱ्या बोअरवेलच्या पाण्यामुळे आरोग्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत सोसायटीने स्थानिक लोकप्रतिनिधी, पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने सादर केली आहेत. रोडपाली परिसरातील काही सोसायट्यांना नियमित पाणीपुरवठा होत असताना हंसध्वनी गृहनिर्माण संकुलाला पुरेसा पाणीपुरवठा का होत नाही, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा रहिवाशांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सिडको ने बांधलेल्या कळंबोली येथील गृहनिर्माण प्रकल्पातून घर खरेदी केले परंतु आता पाण्याचा गंभीर प्रश्न हा आमच्या समोर निर्माण झाला आहे.सिडको कडून घर घेतल्याचा मनस्ताप आता सहन करावा लागत आहे. सिडको अधिकारी पण पाहत नाहीत व महापालिकेच्या अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे जगावे कसे असावे मोठा यक्षप्रश्न आमच्या सर्व रहिवाशांवर येऊन ठेपला आहे.बाहेरचे विकत पाणी घ्यावे तर आर्थिक खर्च आणि खिशाला कात्री बसत आहे. सिडको व महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे खेपा मारून आम्ही त्रस्त झालो आहोत.
- ॲड. अभिजीत धुमाळ, सचिव हंसध्वनी गृहनिर्माण सोसायटी