

सुवर्णा दिवेकर
अलिबाग: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्ह्यात एकूण ८६२ मत्स्यपालन प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना मत्स्यबीज, मत्स्यखाद्य आणि आधुनिक मत्स्यपालनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या योजनेत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला एक हजार रोहू, कटला आणि मृगळ या सुधारित जातींचे मत्स्यबीज तसेच ६० किलो मत्स्यखाद्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय मत्स्यबीज संगोपन, खाद्य व्यवस्थापन, पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक मत्स्यबीज व मत्स्यखाद्याचा पुरवठा मल्हार फिश इंटरप्रायझेस, वीर फिश सीड हॅचरी, वीर (ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे शेततळ्यांचा वर्षभर उत्पादक वापर होऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त व शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्यपालन केल्यास उत्पादनवाढीसह आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी निवड झालेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मत्स्यपालन करावे आणि या योजनेचा प्रभावी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
शेतीसोबत मत्स्यपालनाचा पूरक व्यवसाय विकसित करण्यासाठी 'आत्मा' योजनेचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत आणि अधिक उत्पन्नाचा नवा मार्ग खुला होणार आहे.
शेततळे उपलब्ध असलेल्यांना संधी
अलिबाग तालुक्यातील खाडीलगतच्या भागात शेततळे उपलब्ध असलेल्या आणि मत्स्यपालनासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी प्राधान्याने निवड करण्यात आली आहे.
शेतीबरोबरच शेततळ्यांचा प्रभावी वापर करून मत्स्यपालनाचा पूरक व्यवसाय विकसित करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि एकात्मिक शेती पद्धतीला चालना देणे हा या प्रात्यक्षिकांचा प्रमुख उद्देश आहे.
खाडीलगतच्या भागातील शेततळ्यांचा प्रभावी वापर करून मत्स्यपालनाला चालना देणे, शेतीबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- तन्मय भगत, तालुका कृषी अधिकारी, अलिबाग