

कोप्रोली ः पंकज ठाकूर
मागील तीन वर्षभरापासून रखडत सुरू असलेल्या उरण पूर्व विभागाला जोडणाऱ्या गव्हाणफाटा - चिरनेर दरम्यानच्या मालगाडी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड नवा पुल उभारण्याचे काम येत्या मार्च 2026 अखेरपर्यंत पुर्ण होईल.त्यानंतर या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरळीत होणार असल्याने मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या पाच प्रवासी व वाहनांना दिलासा मिळणार आहे.
जेएनपीए बंदरातुन देशभरात कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावरील दुहेरी कंटेनर वाहतूक करण्याची योजना आखली आहे.ही दुहेरी कंटेनर वाहतूक उंची वाढवुन सुरळीत सुरू करण्यासाठी उरण पूर्व विभागाला जोडणाऱ्या गव्हाणफाटा - चिरनेर दरम्यानच्या मालगाडी रेल्वे मार्गावरील जुना ओव्हरहेड पुल (आरओबी) तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आला आहे.पाडण्यात आलेल्या या ओव्हरहेड पुलाच्या जागी नवीन पुलाचे काम मागील तीन वर्षांपासून रखड पट्टीत सुरू आहे.
याच जुन्या पुलावरून पनवेल, मुंबई,नवी मुंबई व ठाण्यासह इतर मार्गाकडे जाणाऱ्या व उरण पूर्व विभागाशी जोडणारा गव्हाणफाटा - चिरनेर रस्त्यावरुन दररोज पाच हजारांहून अधिक वाहने आणि प्रवासी प्रवास करीत होते.मात्र मध्य रेल्वेच्या कंटेनर मालाची वाहतूक करणारा ओव्हरहेड पाडण्यात आल्यानंतर जुना ओव्हरहेड पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या नव्याने ओव्हरहेड पुलाच्या बांधकामासाठी या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.परंतु पर्यायी रस्ता वाहनांना गव्हाणफाटा सर्कल वरून सुमारे दिड किलोमीटरचा वळसा घालून चिर्ले मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे.तर चिरनेर मार्गांवरून येणाऱ्या वाहनांना पनवेलकडून येणाऱ्या महामार्गाच्या उलट्या धोकादायक मार्गातून वळसा घेऊन गव्हाणफाटा मार्ग गाठावा लागत आहे.
गव्हाणफाटा - चिरनेर मार्गांवरील रेल्वे पुल बंद करण्यात आल्याने उरण तालुक्यातील जांभूळपाडा, वेश्वी,दिघोडे या गावाची एसटी बससेवा बंद झाली आहे.तसेच या मार्गांवर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच हा पर्यायी रस्ता प्रवासी रिक्षा, मॅजिक रिक्षा आणि अन्य वाहनांसाठी धोकादायक ठरू लागलेला आहे.
सर्वासाठी खार्चिक ठरलेला पर्यायी रस्ता बाजारहाट व अन्य कामांसाठी पनवेल, नवीमुंबई मार्गाकडे जाण्यासाठीही गैरसोयीचा ठरु लागला आहे.त्यामुळे या मार्गावरील ओव्हरहेड पुलाचे काम मध्य रेल्वे प्रशासन पुर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांना होती.मात्र कामाच्या विलंबामुळे प्रवासी व वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे.यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गावरील प्रवासी व वाहतूकदारांसाठी बंद करण्यात आलेला रेल्वे पुल पुन्हा वाहतूकीसाठी खुला होणार आहे.त्यामुळे या मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या पाच प्रवासी व वाहनांना दिलासा मिळणार आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे या पुलाच्या कामाला विलंब झाला असला तरी मात्र मागील तीन वर्षभरापासून रखडलेल्या मालवाहू रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड पुलाचे काम जोमाने सुरू आहे. कामाला वेग आला आहे.यामुळे येत्या मार्च 2026 अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास जाईल.
राघवेंद्र श्रीवास्तव, सहाय्यक अभियंता, डीएफसीसीआयएल, रेल्वे विभाग