

मुरबाड शहर (रायगड) : किशोर गायकवाड
मुरबाड शहराच्या प्रवेशद्वारावर स्थित असलेला म्हसा नाका अर्थात वाहनांचा सततचा गोंगाट, हॉर्नचा कर्कश आवाज, धुळीचा पांढरट पडदा तसेच मच्छी व्यावसायीक, फळ विक्रेते, काही पक्की दुकाने व खासगी हॉस्पिटल आणि त्यातच एक क्षण थांबलेलं हे वास्तव. याच म्हसा नाक्यावर, ट्रॅफिकच्या गर्दीत अडकलेला एक ट्रॅक्टर दैनिक पुढारीच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
वीटभट्टीवरून विटांनी ओथंबून भरलेला तो ट्रॅक्टर सरळगावच्या दिशेने वळण घेत होता. मात्र समोर आलेल्या वाहतुकीच्या गर्दीमुळे त्याला इथेच थांबावं लागलं. आणि त्या थांबलेल्या क्षणात समाजाचं खरं वास्तव उघडं पडलं. ट्रॅक्टरवरील विटांच्या ओझ्यावर बसलेली पाच चिमुकली आदिवासी लेकरं... डोळ्यांत कुतूहल नाही, चेहऱ्यावर बालसुलभहास्य नाही. आणि स्टिअरिंगवर बसलेला एक कवळ्या वयातील चालक; ज्याचं वय शाळेच्या वर्गात असायला हवं होतं, पण तो आज श्रमाच्या ओझ्याखाली दबलेला दिसत होता.
ही लेकरं कुठे चालली आहेत? शाळेत नाही खेळाच्या मैदानात नाही तर वीटभट्टीवर, माती मळण्यासाठी, विटा रचण्यासाठी, उन्हात भाजण्यासाठी. त्यांच्या हातात पुस्तकं नाहीत, दप्तर नाहीत, हातात आहे फक्त कष्टाचं भविष्य. वीटभट्टी म्हणजे या मुलांचं दुसरं घर. आई वडील रोजंदारीवर राबणारे, स्थलांतरित जीवन जगणारे. त्यामुळे ही लेकरंही मजुरीच्या प्रवासात ओढली जातात. शिक्षणाचा अधिकार कागदावर आहे, पण प्रत्यक्षात या ट्रॅक्टरवर बसलेलं बालपण तो अधिकार गमावताना दिसतं.
या परिस्थितीला जबाबदार कोण? वीटभट्टी मालक, बालमजुरीकडे डोळेझाक करणारी यंत्रणा, की प्रश्न विचारण्याऐवजी सवयीने पुढे जाणारा समाज ? ट्रॅक्टरवर मुलांची अशी वाहतूक कायद्याने गुन्हा आहे. बालमजुरी प्रतिबंधक कायदे आहेत, शिक्षणाचा हक्क आहे, तरीही हे चित्र रोज दिसतं; कारण अंमलबजावणीचा अभाव आणि संवेदनशीलतेची कमतरता म्हणावी का? असे शेकडो निरुत्तरीत प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत.
मालवाहू वाहनांवर मानवी वाहतूक थांबवणे गरजेचे
उपाय म्हणून वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कुटुंबांची नोंदणी बंधनकारक करणे, तिथेच तात्पुरत्या शाळा व अंगणवाड्या सुरू करणे, बालमजुरी आढळल्यास तत्काळ कारवाई, ट्रॅक्टर व मालवाहू वाहनांवर मानवी वाहतूक थांबवणे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे समाजाने अशा दृश्यांकडे 'नेहमीचंच आहे' म्हणून पाहणं बंद करणं, हे प्रभावी ठरू शकेल का? कारण म्हसा नाक्यावर थांबलेला तो ट्रॅक्टर केवळ ट्रॅफिकमुळे थांबलेला नव्हता तो आपल्या व्यवस्थेचं अपयश, प्रशासनाची उदासीनता आणि समाजाचं मौन दाखवत उभा होता. आज तो ट्रॅक्टर पुढे निघून गेला असेल पण त्या मुलांचं थांबलेलं बालपण मात्र अजूनही विशेत्त उभं आहे