

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हरभरा पीक लागवडीकडे विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल 973.80 हेक्टर क्षेत्रामध्ये हरभरा लागवड केली जाणार असून अनेक तालुक्यांमध्ये पेरणीची कामेही पूर्ण झाली आहेत. सरकारकडून प्रोत्साहन आणि नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनीही हरभरा लागवडीला पसंती दिली आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भातपीक कापून झाल्यावर जी ओलसर जमीन राहते, त्या जमिनीवर जिल्ह्यातील शेतकरी कडधान्याची लागवड करतात. यात प्रामुख्याने वाल, पावटा, मूग व मटकी हरभरा यांचा समावेश असतो; परंतु यंदा हरभराही मोठ्या प्रमाणात होणार आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड करावी, याकरिता कृषी विभागाने पावले उचलली आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता वेळेमध्ये सुमारे 780 क्विंटल बयाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. प्रत्येक तालुक्यांमध्ये बियाणांचे वाटप पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची कामेदेखील पूर्ण केली आहेत. राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यांकरिता हरभरा लागवडीचे विशेष उद्दिष्टही देण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना हरभरा लागवडीकरिता प्रवृत्त केले जात आहे.
एकरी 15 ते 22 क्विंटल उत्पादन
हरभरा पिकाचे एकरी 15 ते 22 क्विंटल उत्पादन घेणे शक्य होते. हे पीक 110 ते 120 दिवसांमध्ये तयार होते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र आणि पंजाब ही राज्ये प्रामुख्याने हरभरा पीक घेतात. सध्या हरभरा 100 ते 150 रुपये प्रति किलोने विकला जात आहे.
रब्बी हंगामात कडधान्य आणि भाजीपाल्याचे पीक शेतकरी घेतो मात्र कडधान्याचे क्षेत्र जरी कमी झाले असले तरी राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत मोफत बियाण्याचे वाटप करून आहे ते क्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
वंदना शिंदे, कृषी अधीक्षक, रायगड