

अलिबाग : अलिबाग-नागाव आणि उरण-कोप्रोलीत गेली दोन दिवसांपासून बिबट्याचा संचार दिसून आला आहे. अलिबागध्ये बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाले आहेत, मात्र बिबट्याला पकडण्यात अथवा त्याचा ठावठिकाणा लावण्यात यश आले नसल्याने नागाव आणि कोप्रोली येथे प्रशासनाचा जागता पहारा सुरू आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिम, रोहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम, अलिबाग वनविभाग कर्मचारी, पोलिस, स्थानिक ग्रामस्थ यांनी दोन दिवस अथक प्रयत्न करूनही बिबट्याला पकडण्यात अपयश आले. तसेच बुधवार सकाळपासून गावात कुणाच्याही दृष्टीस बिबट्या पडला नाही. तसेच त्याचे अस्तित्व असलेल्या खुणाही गावात सापडल्या नाहीत. गावातून बिबट्या बाहेर असा अंदाज बांधण्यात येत आहे. रेस्क्यू टिम हात हलवत मागे परतल्या आहेत.
आता केवळ वन विभागाचे काही कर्मचारी गावात असून, कुणाला बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागासोबत संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. येथे बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह रोहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच साहित्याचा अभाव यामुळे त्यांच्या मर्यादा उघड झाल्या.
परिणामी बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना बिबट्याला पकडण्यात अपयश आले. आता वन विभागाचे काही कर्मचारी गावात असून, नागरिकांनी सतर्क राहावे, बिबट्या दिसल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन करीत, बिबट्या दिसल्यास वनविभागासोबत तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
उरणच्या पूर्व भागातील पुनाडे, कोप्रोली परिसरात बिबट्याचा संचार असून कोप्रोली गावातील एका शेतकऱ्याच्या दोन बकऱ्या मारल्या असल्याची बाब समोर आली आहे. या बकऱ्यांचा अर्धवट खाल्लेला मृतदेह जंगलात आढळून आल्याने बिबट्याच्या असण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले असून येथे जागता पहारा सुरु आहे.
नागरिकांमध्ये बिबट्याची भीती कायम
गावात शिरलेला बिबट्या सापडला नसून, त्याची शोध मोहिमही थांबविण्यात आलेली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याचे कोणतेच अस्तित्व गावात आढळले नसले तरी, पुन्हा बिबट्या गावात आला तर काय करायचे. स्वतःचे व पाळीव प्राण्यांचे रक्षण कसे करायचे? असा प्रश्न त्यांना सतावीत आहे. तसेच जिल्ह्यात बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्याला पकडण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षित मनुष्यबळ व आवश्यक साहित्याचा अभाव असल्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नागाव आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या 48 तासांत बिबट्या नागरिकांना कुठेही दिसला नाही तसेच कोणत्याही प्राण्याला इजा केली नाही. सध्या पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचारी यांची दिवसरात्र फेरी असते. आज नागाव येथील बाजारही भरला होता. शाळा दोन दिवस बंद ठेवल्या होत्या. सध्या अलिबाग तहसीलदारांच्या सूचनेप्रमाणे शुक्रवारीही शाळा बंद राहणार आहेत. येथे आम्ही जातीने लक्ष देत आहोत. वनविभागानेही आपल्याकडे नसणाऱ्या साहित्याची खरेदी करावी जेणेकरून पुढे कुठे असा प्रसंग घडला तर आपण सज्ज असू.
हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव ग्रामपंचायत