

Raigad Mahad chemical waste water pollution
खाडीपट्टा : खाडीपट्टयाच्या खाडीच्या निमूलत्या पात्रात दिवसाढवळया महाड औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यातील सांडपाणी सोडले जात आहे. रासायनिक सांडपाण्याच्या उग्र वासाने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेली तीन-चार दिवसांत सोडलेल्या रासायनिक मिश्रित सांडपाण्यामुळे नागरिकांसह, गाय, वासरांना देखील त्रास झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
गेली तीन-चार दिवस मुठवली, जुई आणि ओवळे येथील जांभळी पर्यंतच्या दरम्यान खाडीच्या निमुळत्या पात्रात महाड औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यातून निघणारे प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडल्यामुळे गाय, वासरांना त्रास झाला असून तसेच नागरिकांना देखील उग्र दुर्गंधीयुक्त वासापासून त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. जांभळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असल्याचे स्थानिक आदिवासी बांधवांनी सांगितले.
महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या निर्मितीपासूनच गेली ३ दशकांमध्ये रासायनिक कारखान्यांचे प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट खाडीपट्टयातील खाडीच्या निमुळत्या पात्रामध्ये बेधडक सोडले जात आहे. यामुळे त्याचे वाईट परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावे लागत आहेत. रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर सोडण्यात येणारे हे सांडपाणी, मात्र अत्यंत दुर्गंधीयुक्त पाणी असून त्यामुळे दुर्गंधीने स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. गेली तीन दिवसांमध्ये सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे गायी, वासरांना देखील त्रास झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.
वास्तविक औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यांचे प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट अरबी समुद्रात सोडणे गरजेचे होते. मात्र सदर रासायनिक सांडपाण्याची पाईप लाईन खाडीपट्ट्यातील अनेक गावांच्या दरम्यान असलेल्या नदीपात्रामध्ये खुलेआम सोडण्यात येते. त्याच्या होणाऱ्या नाहक त्रासाबद्दल स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी औद्योगिक विकास महामंडळाविरोधात मोर्चे, आंदोलन काढले, मात्र रासायनिक सांडपाणी थांबू शकलेले नाही. रासायनिक सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे, मात्र गंभीर दखल प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनी आजतागायत घेतली नाही. त्यामुळे रोज मरे त्याला कोण रडे याप्रमाणे येथील रासायनिक सांडपाण्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीच्या वासाने होणाऱ्या त्रासाला सामोरे जाणे व्यतिरिक्त काहीच करता येत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
औद्योगिक विकास महामंडळातील सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्याच्यामुळे खाडीपट्ट्यातील पाण्याचे स्त्रोत दूषित झाले तसेच भात शेतीसह, कडधान्य आणि मच्छीमारी देखील संपुष्टात आली आहे. या बदल्यात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी आणि वारंवार आरोग्य शिबिरे गावागावांमध्ये राबविले जातील असे त्यावेळी आश्वासित करण्यात आले, मात्र आजतागायत याची कोणतीही पूर्तता झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रासायनिक सांडपाण्यामुळे खाडीपट्ट्यातील पाणी पिण्याच्या विहिरी, कुपनलिका दूषित झाल्यामुळे खैरे धरणाचे एकमेव स्त्रोत खाडीपट्टावासीयांना उपयुक्त ठरले असले, तरी मात्र खैरे धरणाची पाणीपट्टी संबंधित औद्योगिक विकास महामंडळातील कारखानदारांनी भरण्यासाठी आजतागायत नकारच दिला आहे.
गेली तीन-चार दिवसांत सोडलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे याठिकाणी दुर्गंधी सुटली असून त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर आमची मासेमारी देखील धोक्यात आली आहे तसेच नदीच्या पात्रात उतरल्यानंतर अंगाला खाज सूटत आहे.
- स्थानिक आदिवासी महिला