

रोहा: दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव जागांवर अनधिकृतपणे बसणे, राखीव डब्यांत विनापरवाना प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाली तसेच रेल्वे हद्दीत बेकायदा प्रवेश करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धडक मोहीम राबवली. १ ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ६७७ प्रकरणे उघडकीस आली असून १० लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रवाशांची सुरक्षितता, स्थानकांवरील शिस्त आणि गाड्यांमध्ये अडथळामुक्त प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तिकीट तपासणी पथके, उपनगरीय पथके, महिलांसाठीची ‘तेजस्विनी’ पथके, ‘अमेनिटी टीम्स’, आरपीएफ तसेच वाणिज्यिक अधिकारी आणि निरीक्षकांनी संयुक्तपणे कारवाई केली.
रेल्वे कायद्याच्या कलम १५५(१) अंतर्गत ३२१ प्रकरणांमध्ये ६ लाख ३७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव सुविधांचा गैरवापर करणाऱ्यांवर या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली. कलम १५५(१)(ब) अंतर्गत ९३ प्रकरणे नोंदवून ९३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
विशिष्ट प्रवासी वर्गासाठी राखीव डब्यांमध्ये विनाअधिकार प्रवास करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत विक्रीप्रकरणी कलम १४४ अंतर्गत ९९ जणांवर कारवाई करून १ लाख ९८ हजार रुपये, तर रेल्वे हद्दीत अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी कलम १४७ अंतर्गत १६४ प्रकरणांत ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
मानखुर्द आघाडीवर
या मोहिमेत मानखुर्द स्थानकावर सर्वाधिक २८९ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून ४ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल झाला. त्यापाठोपाठ वडाळा रोड येथे २३२ प्रकरणांत २ लाख ५७ हजार रुपये, तर ठाणे स्थानकावर ६१ प्रकरणांत १ लाख २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, घाटकोपर, पनवेल, मशीद, चिंचपोकळी, चेंबूर, सानपाडा, शिवडी, वाशी आणि लोणावळा आदी स्थानकांवरही कारवाई करण्यात आली.