रायगड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (26 ऑगस्ट) मुंबई-गोवा महामार्गाचा पहाणी दौरा आयोजित केला होता. दहा-बारा दिवसांवर गणेशोत्सव असताना मुख्यमंत्र्यांना जाग आल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवारी दुपारी महामार्गावरील पेण-वाशी येथे महामार्गाची पहाणी करणार्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे संपर्क प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना वक्ते धनंजय गुरव, विभाग प्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, जिल्हा समनवयक नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख जगदिश ठाकूर, अलिबाग-पेण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवघ्या काही दिवसात गणेशोत्सव सुरु होणार आहे. असे असताना भाजपा-शिवसेना शिंदे सरकारला दुरावस्था झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आताच वेळ मिळाला का...? असा सवाल शिवसेना उबाठा गटाने केला आहे. अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्ग पाहणी म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप उबाठा गटाने केला आहे. शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यात येत असल्याचे शिवसेना उबाठा गटाने म्हटले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि संपर्कप्रमुख विष्णु पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महामार्गावरील पेण वाशी येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जोरदार धोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.