

Bhausaheb Fundkar Falbaag Lagvad Yojana
अलिबाग : शेतकर्यांचे उत्पन्न वाढीसाठी शासन विविध योजना राबवत आहे. यापैकी एक फळबाग लागवड करण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना 100 टक्के अनुदान दिले जात आहे.
राज्यात मुख्यत्वे शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने तांदूळ, गहू, सोयाबीन, तूर कापूस यासारखेच पीक जास्त घेतात. यामुळे त्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही आणि शेतकरी कर्जाच्या ओझाखाली जातो. यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच शेतकर्यांनी फळबाग शेतीतून उत्पन्न वाढवावे आणि राज्यातील शेतकरी समृद्ध बनेल हेच ध्येय ठेऊन सरकार ही योजना राबवित असते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर गेल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सबमिट करताना अर्ज एकदा पाहून सबमिट करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे निकष काय आहेत?
1.या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थी हे अपात्र ठरतील.
2. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे. जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
3. जमीन कुळ कायदयाखाली येत असल्यास आणि 7/12 च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक असेल.
4. अनुसूनित जाती/ जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला, दिव्यांग यांना प्राधान्य दिले जाईल
रायगड जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी या फळाची लागवड केली जाते. यामध्ये आंबा 16,229.87 हेक्टर, काजू 2610.07 हेक्टर, नारळ 1301 हेक्टर, सुपारी 954.30 हेक्टर, तर चिकू 155.40 हेक्टर अशी एकूण 21 हजार 281 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.