

भारत चोगले
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविल समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकाकडून झालेला प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुण्याहून आलेल्या एका पर्यटकाने समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर थेट मंडप व स्टेज उभारून खासगी विवाहसोहळा पार पाडल्याची माहिती समोर आली आहे. सदर विवाहसोहळा कोंडविल येथील सिल्वर सॅण्ड हॉटेलसमोर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पार पडल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहासाठी आवश्यक असलेले मंडप, स्टेज व इतर साहित्य बाहेरून आणण्यात आले होते. विवाहास उपस्थित असलेल्या वधू-वर व नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था समोरच असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, महसूल विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे.
समुद्रकिनारे हे पर्यावरणीयदृष्ट्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील क्षेत्र मानले जातात. अशा ठिकाणी कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र इतका मोठा मंडप व स्टेज उभारून विवाहसोहळा पार पडत असताना स्थानिक प्रशासनाला याची माहिती नसणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
या प्रकरणात संबंधित विवाहसोहळ्यासाठी समुद्रकिनाऱ्याची जागा कोणी उपलब्ध करून दिली, कार्यक्रमास परवानगी कोणी दिली अथवा कोणाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन होत असेल, तर त्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.