

रायगड : रायगड जिल्ह्यात मोसमी पावसाने आता चांगलीच दमदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणचे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेले आहेत.धरणेही मोठ्या प्रमाणात भरुन वाहू लागलेली आहे.अशावेळी पावसाळी पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांचा अतिउत्साह जीवावर बेतू लागल्याने श्रीवर्धन तालुक्यातील धबधबे,धरणावर प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे. मेघरे,कारविणे, गालसुर येथील धबधबे तसेच व बाणगंगा, सायगांव धरण क्षेत्रावर जाण्यास तालुका प्रशासनाने बंदी घातली आहे.
श्रीवर्धन पोलीस ठाणे हददीतील धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात येथे मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांची/ तालुक्यातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासनास त्रासदायक ठरते, तसेच मान्सून कालावधीमध्ये धरण, धबधबे व तलाव पूर्ण भरुन वाहत असतात व मान्सुन मुळे आजुबाजुच्या डोंगर कपार्यांमधून धबधबे सुरु होतात. त्यामुळे पर्यटक व नागरीकांची तेथे झुंबड उडते त्यामुळे मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागांमध्ये पाण्यात बुडुन मृत्युबाबत घटना घडल्या आहेत. कारविणे येथील धबधब्याच्या पाण्यात बुडुन मृत्यूु झाल्याची घटना घडली आहे.
संभाव्या दुर्घटना टाळण्यासाठी यावर्षी कोणत्याही प्रकारे धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात लोकांची गर्दी होऊ नये तसेच जिवीत हानी होऊ नये याकरीता 30 सप्टेंबर पर्यंत श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघडया जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्यांचे कठडे, धोकादायक वळणे, इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणार्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हिडीओ बनविणे.
रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणार्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करु नये.
धरण,तलाव, धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात दुचाकी/तीन चाकी/चार चाकी / सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून), या अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
महेश पाटील , श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी