

पनवेल : एटीएम कार्डची अदलाबदली करून 50 हजार रुपये काढून फसवणूक केल्या प्रकरणी दोन अनोळखी इसमाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश रेवनप्पा गुरव हे सेक्टर 8, नवीन पनवेल येथे राहत असून 3 सप्टेंबर रोजी ते बँकेतून पैसे काढण्यासाठी नवीन पनवेल येथे गेले. त्यानंतर ते एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. पैसे काढत असताना पैसे आले नाहीत. त्यावेळी पाठीमागून एक इसम एटीएममध्ये आला आणि तो पैसे काढू लागला. त्याचे देखील पैसे निघाले नाहीत.
त्यानंतर पुन्हा गुरव यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघाले नाहीत. यावेळी तो इसम पुन्हा जवळ आला व गुरव यांचे कार्ड घेऊन पैसे काढून देण्याचा बहाणा केला. यावेळी दुसर्या इसमाने हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड दिले आणि गुरव यांचे कार्ड घेऊन ते निघून गेले. एटीएममधून पैसे न निघाल्यामुळे गुरव घरी गेले. त्यानंतर त्यांना दहा हजार रुपये प्रमाणे पाच वेळा 50 हजार कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.