Atal Setu Safety Concerns: अटल सेतू ठरतोय नवीन ‘सुसाईड पॉईंट’? वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सहा महिन्यांपूर्वी एका नामांकित डॉक्टरनेही नैराश्यातून याच पुलावरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती.
Atal Setu Safety Concerns
Atal Setu Safety ConcernsPudhari
Published on
Updated on

राजकुमार भगत

उरण: देशातील सर्वात लांब आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ सध्या एका वेगळ्याच आणि चिंताजनक कारणामुळे चर्चेत आला आहे. वाहतूक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी उभारण्यात आलेला हा देखणा पूल आता आत्महत्या करणाऱ्यांसाठी ‘हॉट स्पॉट’ ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

उदघाटन झाल्यापासून या पुलावरून समुद्रात उडी मारून जीवनप्रवास संपवण्याच्या अनेक घटना घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Atal Setu Safety Concerns
Raigad Rain: रायगड जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात; जूनच्या पहिल्या १० दिवसांत केवळ ३.८ टक्के पाऊस

दोनच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील प्रतिक रासकर या तरुणाने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याची ताजी घटना घडली असून पोलिसांकडून त्याचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र अद्याप त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.

अटल सेतूवरून आत्महत्या करण्याचे सत्र गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, सुमारे दीड वर्षांपूर्वी अलिबाग येथील वैभव पिंगळे या शिक्षकाने या पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यानंतर साधारण सहा महिन्यांपूर्वी एका नामांकित डॉक्टरनेही नैराश्यातून याच पुलावरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती.

या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी घडलेली एक अंगावर काटा आणणारी घटनाही समोर आली होती. एका व्यक्तीने अशाच प्रकारे अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्यावेळी समुद्रात मोठी ओहोटी असल्यामुळे त्याची उडी थेट चिखलावर पडली.

रात्रभर तो चिखलातच अडकून पडला होता आणि बाहेर पडण्यासाठी वाट शोधत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी १०-१५ कि.मी. छातीभर चिखलातून कसाबसा रस्ता काढत तो न्हावा गावाजवळ पोहोचला. मात्र, रात्रभर चिखलात मृत्यूशी संघर्ष केल्यामुळे त्याची शारीरिक व मानसिक अवस्था अत्यंत खालावली होती.

Atal Setu Safety Concerns
Central Railway Revenue: मध्य रेल्वेची १४ दशलक्ष टन मालवाहतूक

या वाढत्या आत्महत्येच्या सत्राला आळा घालण्यासाठी आता पुलाच्या दोन्ही बाजूंना न्हावा शेवा आणि शिवडीच्या दिशेने उंच लोखंडी जाळ्या किंवा अँटी-सुसाईड बॅरियर्स बसवण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याचसोबत पुलावर संशयास्पदरीत्या थांबणाऱ्या गाड्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी २४ तास फिरते सुरक्षा पथक तैनात असणे आणि पुलाच्या खाली सागरी पोलिसांची स्पीड बोट्सद्वारे गस्त असणे आवश्यक आहे.

अटल सेतू हा महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक आहे, मात्र या वास्तूचे रूपांतर ‘सुसाईड पॉईंट’मध्ये होऊ नये यासाठी प्रशासनाने आता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सीसीटीव्ही असूनही दुर्घटना

अटल सेतूवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड गन आणि चोवीस तास सुरक्षा गस्त असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलिसांकडून केला जातो. परंतु, एखादी व्यक्ती गाडी थांबवून कठड्यावर जाईपर्यंत सीसीटीव्हीमध्ये हालचाली टिपल्या गेल्या, तरी सुरक्षा रक्षक तिथे पोहोचेपर्यंत ती व्यक्ती उडी मारते. पुलाच्या बाजूला असलेले कठडे सहज ओलांडता येण्यासारखे असल्यामुळे या घटनांना आळा घालणे कठीण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news