

उलवे : आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. असे प्रतिपादन ’पद्मश्री’ आणि ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारप्राप्त अशोक सराफ यांनी उलवे येथे केले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा हजारो चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील सपत्निक भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. यावेळी नरेंद्र बेडेकर निर्मित ’बहुरूपी अशोक’च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा नागरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता.
या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. अशोक सराफ यांच्यावर प्रेम करणारे चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याने ’भूमिपुत्र भवन’ खचाखच भरले होते. यावेळी अशोक मामांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली.
रामशेठ ठाकूर यांनी आम्ही आजही अशोक सराफ यांचे चित्रपट आणि सिरीयल बघत असतो,असे नमूद केले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, अशोक सराफ यांनी महाराष्ट्रीयन जनतेला खळखळून हसविले. रायगडसाठी लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. रोखठोक बोलण्याची ते नेहमी तयारी ठेवायचे. ज्यावेळी साडेबारा टक्क्यासाठी गोळीबार झाला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी सोडले नाही. सांस्कृतिक मंत्री असताना चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान मी दिले असल्याचे सुचित केले.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, अशोक सराफ यांचे चित्रपटसृष्टीसाठी योगदान खूप मोठे आहे. रसिकांच्या चेहर्यावर आनंद फुलवत ते आजही काम करत आहेत. निवेदिता सराफ यांचे अशोक सराफ यांच्या जीवनामध्ये खूप मोठे योगदान आहे.
यावेळी महेंद्र घरत , प्रशांत देशमुख, रविशेठ पाटील, बबनदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, रवींद्र पाटील, विनोद म्हात्रे, गोपाल पाटील,राम हरी म्हात्रे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
फाळके पुरस्कार मिळायला हवाय
खा. सुनील तटकरे यांनी अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा. आम्हालाही राजकारणात रोज नवनवीन भूमिका कराव्या लागतात. असे त्यांनी सांगीतले.