Political News : भाजपमधील वाचाळवीरांना सुसंस्कृत नेत्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता
ठाणे : आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले होते. जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. भाजपच्या पदाधिकार्यांकडून अशा प्रकारची अनेक वादग्रस्त वक्तव्ये येत असल्याने आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणार्या नेत्यांना आमदार संजय केळकर यांच्यासारख्या सुसंकृत नेत्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असून त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या पत्रात राष्ट्रावादीकडून करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात एकमेकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका करण्यात येत असल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडूनही सत्ताधार्यांवर टीका करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी भाजपच्या नेत्यांकडून कशा प्रकारची चुकीची विधाने केली जातात याचा पाढा वाचला आहे. आजच्या राजकारणात वैयक्तिक टीका,खालच्या पातळीवरील भाषा,आणि अभ्यासू वृत्तीचा अभाव दिसून येतो. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती ढासळली आहे. याचा अनुभव रोजच्या बातम्यांमधून येत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
ही परिस्तिथी बदलण्यासाठी भाजप पक्षाने आपल्या नेत्यांना विशेषतः पडळकर सारख्या नेत्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भाजपने पुढाकर घेऊन पडळकर यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करावेत. आमदार संजय केळकर यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि अनुभवी नेत्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यास भाजपला संजय केळकर यांच्या अनुभवाचा खूप मोठा फायदा होणार आल्याचे पाटील या पत्रात म्हटले आहे. केळकर यांच्यासारख्या नेत्यांना केवळ राजकीय ज्ञान नसून शांतपणे आणि आदराने विरोधकांकडे आपली बाजू कशी मांडावी याचे प्रशिक्षण ते कै.रामभाऊ म्हाळगी प्रबोधन केंद्रात ते शिकवतील असे या पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे. दरम्यान,या पत्रावर भाजपकडून काय प्रतिक्रिया व्यक्त होते हे पहावे लागेल.

