

नेरळ ः कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे आंबिवली गावातील जगदीश कराळे यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली . या लागलेल्या आगीमध्ये घर हे पूर्ण जळून खाक झाले आहे. या मध्ये कराळे कुटूंबीयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटने नंतर कराळे कुटूंबीयाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेश जोशी यांनी 1 लाख रूपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
कराळे यांच्या घराला पहाटे साडेतीन चार या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या लागलेल्या भिषण आगीमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. आग विझवण्या करीता आंबिवली गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग इतकी भिषण व भयंकर होती की या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत . तसेच घराचे पत्रे देखील फुटले आहेत.
या घटनेची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्यात मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहणी करून या आगीच्या प्रकरणाचा तपास सुरू करून, या आगीमध्ये घरात जळालेल्या अवशेषांचे नोंद घेतली आहे. तर शासनाकडून कराळे कुटुंबाला मदतीचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.