

पोलादपूर : आंबेनळी घाट परिसरात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत संशयास्पद आणि धक्कादायक स्वरूपाच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही हत्या असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी आंबेनळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे. प्राथमिक तपासात मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षांदरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मागील काही दिवसांत बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. तसेच मोबाईल लोकेशन, स्थानिक माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.