

अलिबाग ः रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दिनांक 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. या कालावधीत अलिबाग तालुक्यात गटासाठी 55 तर गणासाठी 95, असे एकूण 150 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे दाखल झाले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उमेदवार समर्थकांसह दाखल होत असल्याने निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या गटात व गणात किती उमेदवार रिंगणात उतरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढत्या अर्जसंख्येमुळे अनेक ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत सुरू असून, सर्व अर्जांची प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे. पुढील टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर माघार घेण्याची प्रक्रिया पार पडेल. छाननीनंतर अंतिम उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे.
मुकेश चव्हाण, निवडणूक अधिकारी, अलिबाग