

रायगड: अलिबाग तालुक्यांतील रेवस जेट्टी जवळील नवखार गावाच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावर मांडवा सागरी पोलिसांनी सोमवारी (२९ जून) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेकायदा डिझेल तस्करीवर मोठी कारवाई केली.
मासेमारी बोटींच्या माध्यमातून बेकायदेशीर आणि विनापरवाना डिझेलची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवलेल्या दोन बोटींसह सुमारे १४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी गजानन यशवंत कोळी (वय ३८), अनिल शंकर कोळी (वय ३८, दोन्ही रा. करंजा सुरकीचा पाडा, ता. उरण) आणि योगेश जनार्दन पाटील (वय ३२, रा. करंजा, ता. उरण) यांना अटक करुन दोन्ही बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींनी 'वाघेश्वरी साई' आणि 'एमएफबीआई गुरु माउली' या दोन मासेमारी ट्रॉलर बोटींवर ज्वलनशील डिझेलचा अवैध साठा केला होता. पोलिसांच्या कारवाईत ५ लाख रुपये किमतीची 'वाघेश्वरी साई' बोट जप्त करण्यात आली असून, तिच्या ३ खणांमध्ये सुमारे ३ हजार ५०० लीटर अवैध डिझेल सापडले असून त्यांची किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे.
तसेच ५ लाख रुपये किमतीची 'एमएफबा आई गुरु माउली' ही बोट देखील जप्त करण्यात आली असून, यामध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या एकूण ३३ प्लास्टिक कॅनमध्ये मिळून १ हहार ०३० लीटर अवैध डिझेल सापडले असून त्याची किंमत १ लाख ३ हजार रुपये आहे.
याशिवाय डिझेल उपसण्यासाठी वापरण्यात येणारा ३ हजार रुपये किमतीचा रोटाफ्ल्यूईड कंपनीचा पंप आणि ५० फूट लांबीचा पाईपही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अलिबागचे पुरवठा अधिकारी हर्षल दिनकरराव देशमुख यांनी या बेकायदा डिझेल तस्करी प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भोपळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.