

अलिबाग : शहरातील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल स्वामी छाया येथे सोमवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर, विद्युत साहित्य तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अलिबाग नगरपरिषद अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे, हॉटेलमध्ये ठेवलेले गॅस सिलिंडर आणि ज्वलनशील साहित्य तातडीने बाहेर काढण्यात यश आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अन्यथा आग अधिक भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत आगीचे नेमके कारण आणि उगमस्थान शोधण्याचे काम सुरू होते. विजेच्या शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अधिकृत अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अलिबाग पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांची टीम तात्काळ दाखल झाली. पोलिसांनी परिसर सुरक्षित ठेवत पंचनामा प्रक्रिया सुरू केली.
या घटनेची माहिती मिळताच अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी हॉटेल मालकांची विचारपूस करत संबंधित यंत्रणांना सविस्तर पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि समन्वयित कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेनंतर व्यापारी व नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.