

पनवेल : अनधिकृत इमारतींमधून होणारी वीजचोरी आणि वीजवापरातील अनियमिततेविरोधात महावितरणने ऐरोली परिसरात मोहीम राबवून मोठी कारवाई केली. एकाच दिवसात करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १०५ ठिकाणी अनियमितता आढळली. तर ७८ ठिकाणी १ लाख ४३ हजार ६३ युनिटची तब्बल ३१ लाख ३१ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडलात ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य अभियंता संजय पाटील आणि वाशीचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली गाव, साईनाथवाडी, देशमुखवाडी, गोठवली आणि घणसोली परिसरातील अनधिकृत इमारतींमध्ये वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईसाठी सात विशेष पथके तैनात करण्यात आली होती. पाच कार्यकारी अभियंत्यांसह सुमारे ५० अधिकारी व कर्मचारी अशा ५५ हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. पथकांनी वीजजोडण्या, मीटरची स्थिती, वीजवापराची पद्धत तसेच मीटरमध्ये फेरफार किंवा अनधिकृत वीजवापराची शक्यता यांची सखोल तपासणी केली.
वीजचोरी करणारे अपार्टमेंटची नावे
उघड झालेल्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये ऐरोलीतील माऊली अपार्टमेंटमधील १८ ग्राहकांकडून २६ हजार ७५५ युनिटची ५.३३ लाख, कृष्णा हाईट्समधील सहा ग्राहकांकडून ५ हजार ५३० युनिटची १.२० लाख, मातोश्री अपार्टमेंटमधील ११ ग्राहकांकडून १२ हजार ९५६ युनिटची २.५४ लाख आणि ओमसाई अपार्टमेंटमधील १२ ग्राहकांकडून ११ हजार १६७ युनिटची १.८६ लाख रुपयांची वीजचोरी आढळली.
पनशील अपार्टमेंटमधील तीन ग्राहकांकडून ११ हजार ७०० युनिटची ३.१८ लाख, शारदा अपार्टमेंटमधील दोन ग्राहकांकडून १ हजार ९३७ युनिटची ३२ हजार, तर स्मशानभूमी गार्डन परिसरातील दोन ग्राहकांकडून तब्बल ३९ हजार ६२९ युनिटची ९.६३ लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली.
कारवाईचा इशारा
वीजचोरीमुळे नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर अप्रत्यक्ष आर्थिक भार पडतो. तसेच वीज वितरण व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वीजचोरीविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.