नाते : पुढारी वृत्तसेवा
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जगदीश्वर महादेवाचे मंदिर आहे. रायगडाच्या निर्मितीनंतर श्री जगदीश्वर मंदिरासमोर नंदी महाराजांवर साडेतीनशे वर्षानंतर प्रथमच सोन्याचा मुखवटा बसवण्यात आला. हा सुखद अनुभव आज (सोमवार) उपस्थित शिवभक्तांना प्रत्यक्ष अनुभवता आला.
छत्रपतींचे शासन असेपर्यंत विविध उत्सवा दरम्यान जगदीश्वर मंदिर परिसरात भव्य सजावट करण्यात येत असे. यामध्ये मंदिरासमोरील नंदी महाराजांना सोन्याचा मुखवटा धारण केला जात असे अशी माहिती इतिहासातून बघावयास मिळते.
महाड मधील कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष नितीन पावले व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या दिनानिमित्त या संदर्भात केलेल्या संकल्पची सुरुवात झाली असून, वर्षभरात किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमादरम्यान नंदी महाराजांवर सोन्याचा मुकुट चढविण्यात येणार असल्याची माहिती या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते रोहित पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
आज गडावर आलेल्या शेकडो शिवभक्तांना जगदीश्वर मंदिरासमोरील नंदी महाराजांच्या सोन्याचा मुकुट पाहण्याचा योग आला. कोकणकडा मित्र मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित शिवभक्तांकडून स्वागत करण्यात येत आहे.