

रायगड : रमाकांत मुकादम
वेळ-काळ हा काही सांगून येत नाही. कधीतरी त्याची प्रचिती आपल्यासमोरच आनंदावर विरजण फेरून जाते. एरव्ही काशाचा खडक अगदी रेवस किंवा पिरवाडी येथून निर्विकार उभा असल्याचा दिसतो. परंतु त्या दिवशी तेथे एकवटेला प्रलंयकारी पाऊस आणि निर्माण झालेल्या राक्षसी घुघाटात (चक्रवात) रामदासला जलसमाधी मिळाली. तो दिवस १७ जुलै १९४७ . आज या दुर्दैवी घटनेस ७९ वर्षे होत आहेत, जवळजवळ ७०० रायगडवासियांना या दुर्घटनेत जलसमाधी मिळाली, त्यांच्या स्मृतींचा घेतलेला उजाळा.
धरित्रीवर ऋतुमानाचा संचार पूर्ण वर्षभर सुरू असतो. मात्र दिवसेंदिवस मानवी विकासाच्या नावे जंगल, समुद्रकिनारे, नद्या, डोंगर उद्ध्वस्तीने वाढत्या प्रदूषणाने साऱ्या विश्वात हवामान बदलाचे वारे वाहू लागले. त्यामुळे हजारो प्रकारची जैवविविधता, झाडे नष्ट करीत मानव आक्रमकतेने प्रगतीचे दिवे लावत आहेत. तरी नैसर्गिक महाशक्ती त्यावर सरस ठरत आहेत. सागरगामी म्हणणारी किंवा न बुडणारी जहाजेही सागरीवादळं, प्रलंयकारी पाऊस यामुळे सागर समर्पित होत असल्याच्या घटना घडत आहेत.
जगात सर्वात मोठी जहाज दुर्घटना म्हणून ओळखली जाते ती म्हणजे टायटॅनिक जलसमाधी. मोठ्या डौलाने हजोरो हौसी प्रवाशाना घेऊन ब्रिटनमधील सिम्थप्टन ते न्यूयॉर्क या सागरी महामार्गावर ता. १५ एप्रिल १९१२ रोजी प्रवासात निघाली. त्यामुळे जगभर आनंदवार्ता उमटल्या आणि प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशी अटलांटिक महासागरात हिमनगास आदळून टायटॅनिक जहाजास जलसमाधी मिळाली. जवळजवळ १५०० प्रवासी थंडीने गारठून बुडाले.
अशीच दुर्दैवी घटना भारतीय सागरी क्षेत्रात घडली ती म्हणजे रामदास जलसमाधी. १७ जुलै १९४७ रोजी. विशेषतः रायगड जिल्ह्यातील रेवस, अलिबाग, पेण, रेवदंडा परिसरातील प्रवासी त्या दिवशी आपल्या नातेवाईक, सहकाऱ्यांच्या आठवणीने गटारीसाठी मोठ्या उत्सुकतेन निघाले. सकाळी ८ वाजता भाऊच्या धक्क्यावर नेहमीच्या रामदास बोटीत बसले. त्या दिवशी पावसाची रिपरिप होती परंतु मोठ्या वादळी वाऱ्याचे रंग दिसत नव्हते. त्या दिवशी गटारीचा सण असल्याने अधिक गर्दी होती. अगदी शिडीकाढीपर्यत प्रवाशांची जा-ये होती. प्रवाशांच्या नातवाईकांचीही गर्दी होती. स. ८ वा. च्या दरम्यान रामदासच्या कॅप्टनने टिंग टिंग बेल वाजवून बोटीला धक्का सोडल्याचे निर्देश दिले. अन् रामदास निघाली आपल्या नेहमीच्या प्रवासाला की निजधामाला...
धक्का परिसरात पावसाची रिपरिप होतीच तसेच दूरवर लाटांच्या फेसाळल्याचे पुंजके दिसते होते. धक्क्यावर दोर सुटला, शिडी निघाली अन् पंख्याने धक्क्याकडील बाजूस उंच फरा देऊन बोट समुद्री दिशेने निघाली. कॅप्टनने पुन्हा एकदा टिंग टिंग सिंग्नल दिला. अन् बोट फूल स्पीडने लाटा कापत निघाली. दहा-पंधरा मिनिटाच्या अवधीने बोट धक्क्यापार झाली.
पुढे वाढत्या वाऱ्यांचा तांडव, पावसाच्या थैमानाने बोटीला लावलेल्या ताडपत्र्यांवर लाटांचे फरे प्रवाशांवर आदळू लागले. बोटीला ना धक्का अथवा रेवसची सामुद्रधुनी दिसत नव्हती. कॅप्टनने वातावरणाचा रंग ओळखला, तो बोट फिरवूही शकत नव्हता असा चक्रवात आसमंती उसळला होता, जणू काळ्या डोहात रामदास फूल स्पीडने रेवसतटी हुंदकत होती परंतु तिन्ही बाजूने वादळी वारे, पावसाच्या तांडवाने रामदास एखाद्या कचकड्यासारखी लाटांवर धाप टाकत होती. प्रवासी सैरावर होऊ लागले.
जीवाच्या आकांताने कित्येक प्रवाशांनी मिळेल साधनाने समुद्रात उड्या घेतल्या, जवळजवळ अर्धी बोट पाण्याने भरून गेली. रामदासचा वेग मंदावला अन काशाच्या खडकाच्या समांतर उसळलेल्या अशाच एक पंधरा फुटी राक्षसी लाटेने रामदास बोटीला जलसमाधी मिळाली. ही घटना १७ जुलै १९४७ रोजी स. ९ च्या दरम्यान पूर्वेस रेवस धक्का तसेच उत्तरेस पिरवाडीपासून अवघ्या तीन मैलावर घडली.
या घटनेवेळी रेवस धक्क्यावरून कोळीबांधव मासे विक्रीसाठी ससून बंदराकडे निघाले होते, परंतु नवखारच्या दांडीपुढे त्याने आपले मचवे मागे घेतले. कारण आभाळाचा रंग त्यांनी ओळखला, अन मचवे रेवस बंदरी लावले. स. ९ वा. नंतर आभार मोकळे होताच त्यांनी पुन्हा आपले मचवे घेऊन ससूनकडे निघाले. परंतु नवखारच्या दांडी सोडताच त्यांना काहीतर विपरीत घडल्याचे लक्षात आले. अनेक जण किनाऱ्याकडे पोहत येत असल्याचे तर अनेकांचे देह आभाळाकडे निपचत पाहतान दिसले. त्यांनी तात्काळ मचव्यातील मासे समुद्रात फेकून कित्येक प्रवाशांना वाचविले अन् रेवस बंदरात घेऊन आले.
दुपारी 1. 00 वा. ही खबर तारेने अलिबाग दिली तर त्याच वेळी पिरवाडी किनारी सकाळी आलेले शेकडो पर्यटक उसळलेल्या घुघाटाने (चक्रवात) आपली घरे गाठली, परंतु आभाळ मोकळे होताच पुन्हा किनारी आले. अनेक पर्यटकांनी तेथे अनेक प्रवासी किनारी पोहोताना येताना पाहिले, कित्येक गतगल अवस्थेत होते. त्या पर्यटकांनी प्रसंगावधान दाखवून समुद्रात उड्या घेऊन कित्येकांना वाचविले. याच घटनेत अलिबाग येथील १२ वर्षीय बारक्या मुकादम या मुलाने लाईफ जॅकेटच्या सहाय्याने लाटांवर लायन गेट परिसर गाठला. नौदलाच्या बोटीने त्यास बोटीवर घेतला, त्याने रामदास बोट दुर्घटनेची माहिती दिली.
त्या दिवशी समुद्राने केवळ एक बोट गिळंकृत केली नव्हती; त्याने शेकडो संसारांचे आधार, हजारो डोळ्यांतील स्वप्ने आणि असंख्य कुटुंबांचे आयुष्यच हिरावून घेतले होते. गटारीचा सण साजरा करण्यासाठी घराकडे निघालेले अनेक जण पुन्हा कधीच आपल्या उंबरठ्यावर परतले नाहीत. ७९ वर्षांनंतरही रेवस, अलिबाग, पेण आणि रायगडच्या किनाऱ्यावर वाहणारा वारा जणू त्या आक्रोशाचीच साक्ष देतो. काशाच्या खडकाजवळ उसळलेल्या त्या राक्षसी लाटा आज शांत झाल्या असल्या, तरी रामदास दुर्घटनेची वेदना काळाच्या लाटाही पुसू शकलेल्या नाहीत. त्या जलसमाधीत हरपलेल्या प्रत्येक जीवाला हीच खरी श्रद्धांजली!
निसर्गापुढे माणूस कितीही सामर्थ्यवान झाला, तरी त्याच्या संकेतांचा आदर करणे आणि अशा शोकांतिकांच्या स्मृती जपणे, हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.