Warren Alemao and ambulance -वॉरन आलेमाव आणि रुग्णवाहिका

वॉरन आलेमाव आणि रुग्णवाहिका
ambulance
Warren Alemao and ambulance
Published on
Updated on

गोव्यात पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र आंतरग्राम फुटबॉल स्पर्धांना उधाण येते. आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पेडणेपासून काणकोणपर्यंत शेकडो फुटबॉलचे सामने खेळविले जातात. बाणावलीचे उदयोन्मुख राजकरणी वॉरन आलेमाव म्हणतात प्रत्येक फुटबॉल सामन्याच्या ठिकाणी एक रुग्णवाहिका ठेवावी. वॉरनबाबा आपल्या आरोग्य खात्याकडे शंभर तरी रुग्णवाहिका आहेत का? राजकारण करायचे म्हणजे मृत्यूच्या टाळूवरचे लोणी खाण्यासरखे राजकारण करू नये. ही स्पर्धा आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी पुरस्कृत केली होती, म्हणून वॉरन म्हणत असेल प्रत्येक सामान्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका ठेवावी. पंधरा दिवसांपूर्वी त्याच दांडो मैदानावर वॉरनने पुरस्कृत केलेली फुटबॉल स्पर्धा पार पडली. त्यावेळी वॉरनने प्रत्येक सामन्याच्यावेळी रुग्णवाहिका ठेवल्या होत्या का? वॉरनबाब आंतरग्राम फुटबॉल स्पर्धांना प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका ठेवणे कोणालाही शक्य होणार नाही.

प्रतिमा पुन्हा फॉर्ममध्ये

खेर दीर्घ कालावधीनंतर प्रतिमा कुतिन्हो पुन्हा काँग्रेसमध्ये आल्या आहेत. आल्या आल्या त्यांनी फटकेबाजी सुरू केली आहे. भाजपचे तिकीट मी नाकारले, मला सुलक्षणा सावंत यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, काँग्रेसमध्ये जो कचरा होता तो बाहेर गेला. युरी, कार्लस व एल्टन हे काँग्रेसचे खरे हिरे आहेत, माझ्या धमन्यांतून वाहणारे अॅसिड भाजपला खाक करून टाकेल वगैरे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. एका बाजूला चर्चिल आलेमांव आपली कन्या वालंका हिला नावेलीतून काँग्रेस उमेदवारी मिळावी म्हणून गिरीश चोडणकर, मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटून आले. त्यांना पुष्पगुच्छ दिले. आता प्रतिमा कुतिन्होंची घरवापसी झाली आहे. हा आलेमांव यांना इशारा तर नव्हे

भिवपाची गरज ना, रडपाची गरज ना

कुडचडेचे आमदार आणि माजी मंत्री नीलेश काब्राल हे भाजपमधील एक फायरब्रँड आमदार. आमदार असताना त्यांनी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. मंत्री असताना ऑनलाईन बिल भरण्यासारखी सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. मात्र आपल्या मतदारसंघात इतर काही जण काम करत असल्याने ते नाराज आहे. या लोकांना पक्षातूनच फूस मिळते असे त्यांचे म्हणणे आहे. पण मी भाजपशी नेहमीच प्रामाणिक राहिलो. मला तिकीट नाकारण्याचे काहीच कारण नाही. नाकारल्यास पक्षाला कारण द्यावे लागेल असे काब्राल म्हणतात. १२ वर्षांपूर्वी सुरू झालेले काही प्रकल्प अजून रखडलेले आहेत याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की मी स्मरणपत्रे पाठवत असतो. मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने आपण हे प्रकल्प सुरू केले. आता ते कोण अडवतेय हे भीवपाची गरज ना, रडपाची गरज ना म्हणणाऱ्यांनी सांगावे. आता हा बाण नेमका त्यांनी कोणाच्या दिशेने मारला हे वेगळे सांगायची गरज नाही.

है तय्यार हम

शेजारी शेजारी असलेल्या कुडचडे, सावर्डे मतदारसंघांत सध्या घमासान सुरू झाले आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी अनुभवी विरुद्ध युवा असा सामना रंगला आहे. सावर्डेत संकेत आर्सेकर यांनी निवडणुकीचे बिगुल फूंकत 'आता माघार नाही' अशी घोषणा केली आहे. तर त्यांच्या वाढदिनी व्यासपीठावर असलेले आणखी एक युवा नेते रोहन गावस देसाई यांनी कुडचडे मतदारसंघात आपले काम सुरू केले आहे. ते भाजपच्या तिकिटाचे दावेदार मानले जातात. त्यामुळेच नीलेश काब्राल काहीसे अस्वस्थ झाले आहेत. एका मुलाखतीत रोहन गावस म्हणालेत की भाजपची उमेदवारी मिळाल्यास मी निवडणूक लढवणार. ज्याला पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी सर्वांनी काम करायचे आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. त्यांना पक्षातूनच काही वरिष्ठांचा पाठिंबा असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत खात्री आहे. आता त्यांनी 'है तय्यार हम'ची घोषणा केली आहे. आता पक्ष काय निर्णय घेतो हे पाहावे लागेल.

राजकारणात अळंबी वाढली

पावसाळा सुरू झाला की एरवी जंपिंग चिकनची चर्चा असते. यंदा मात्र अळंब्यांचीच अधिक चर्चा आहे. यंदा पेडणे, कुडचडे पाठोपाठ आता नावेलीतही अळंबी तरारून आलेली दिसतात. प्रतिमा कुतिन्होंची काँग्रेसमध्ये घरवापसी होताच त्या अगदी सक्रिय झाल्या आहेत. लोक राजकीय अळंब्यांवर विश्वास ठेवत नाहीत असे त्या म्हणाल्या. प्रतिमा यांच्यामुळे सासष्टीत काँग्रेसमध्ये जान येईल एवढे मात्र खरे. लोकांचे विषय घेऊन रस्त्यावर येणाऱ्या काही मोजक्या नेत्यांत त्यांचा समावेश असतो. एवढी वर्षे पक्षाचे लेबल नसूनही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काही वेगळेपण नाही. प्रतिमा काँग्रेसमध्ये परतल्यामुळे बहुदा नावेलीतील अळंब्यांची अडचण झाली आहे.

गोवा मौज करण्याचे ठिकाण

गोवा हे पूर्वेकडील रोम आहे, येथे खा-प्या मजा करा, अशी स्थिती आहे. गोवा मौज करण्याचे ठिकाण आहे, अशी गोव्याची ओळख अनेक वर्षांपूर्वी झाली होती आणि ती आजही कायम आहे. अशा घटना गोव्यात वारंवार घडतात. मांडवी नदीसह राज्यभर असलेले कॅसिनो आणि किनारी भागातील नाईट क्लबमुळे गोव्याची बदनामी होत आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकाच्या एका माजी मंत्र्याचा चालक जो सध्या उद्योजक आहे तोही अशा प्रकारे कॅसिनोमध्ये आला, मौजमजा केली, त्यानंतर किनारी भागात एका महिलेसोबत गेला, तिथे हॉटेलच्या खोलीत त्याचा मृतदेह आढळला. महिला बेपत्ता आहे. गोवा सरकार गोवा आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र व्हावे यासाठी एका बाजूला प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला कॅसिनो आणि नाईट क्लबच्या माध्यमातून मिळणाऱ्या भरीव महसुलामुळे तेथील गैरकारभार व दुर्घटनांकडे दुर्लक्षही करत आहे. हेही तितकेच खरे.

मराठीसाठी सह्या, विरोधक चलबिचल

गोव्यात कोकणीसोबत मराठी राजभाषा व्हावी, यासाठी गोव्यातून पाच लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे. गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीने तसे ठरवले आहे आणि त्या दिशेने सह्यांची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सत्तरी तालुक्यात तर मराठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन सह्या घेत आहेत. इतर भागांमध्येह तोच प्रकार आहे. त्यामुळे विरोधक चलबिचल झाले असून ही सह्यांची मोहीम बारगळावी, यासाठी त्यांनी हरत-हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मराठी राजभाषा निर्धार समितीचे नेतृत्व सुभाष वेलिंगकर यांच्याकडे असल्यामुळे हे आंदोलन तसे थांबणार नाही, याची जाणीव या मराठी विरोधकांना लवकरच होईल.

सुभाष फळदेसाई यांची कापस्ताद

अनुसूचित जमातीच्या आरक्षणावरून काही मंत्री व आमदारांची झोप उडाली आहे. कोणते मतदारसंघ आरक्षित होतील हे अजूनही घोषित झालेले नाही. तरीही काहींनी अंदाज लावून निवडणूक कोठे लढवायची याची मोर्चेबांधणी सुरू कली आहे. सांगेचे आमदार व मंत्री सुभाष कळदेसाई यांनी त्यांचा मतदारसंघ एसटींसाठी नारक्षित झाला तर जो कोणी भाजपचा उमेदवार नसेल त्याला पाठिंबा देऊन निवडून नाणण्याबाबत भाष्य केले आहे. मात्र ते निवडणूक नढवणार नाहीत असा उल्लेख केलेला नाही. व्यामुळे ते शेजारील मतदारसंघात नशीब आजमावू ाकतात. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार हणून ओळखले जातील. त्यामुळे कोठेना कोठे बागा ते करतील यावर त्यांचा विश्वास आहे. मात्र नापला मतदारसंघ इतरांना दिल्यासही काम करू सांगण्याची कापस्ताद फक्त फळदेसाई ांच्यातच आहे.

घरवापसी ठीक, गृहत्याग का केला होता ?

प्रतिमा कुतिन्हो यांच्या काँग्रेसमधील पुनरागमनाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र, या स्वागताच्या गदारोळात एक प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. २०२१ मध्ये त्या काँग्रेस सोडून जात असताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांना थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले होते? पक्षासाठी वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी, प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असणारी आणि काँग्रेसची बाजू ठामपणे मांडणारी कार्यकर्ती पक्ष सोडण्याचा निर्णय घेते, ही केवळ एका व्यक्तीची हानी नव्हती; तो पक्षासाठीही मोठा धक्का होता. त्यावेळी तिची समजूत काढणे, तिच्या नाराजीची कारणे जाणून घेणे आणि तिला पक्षात टिकवून ठेवणे, ही नेतृत्वाची जबाबदारी नव्हती का? आज तिच्या घरवापसीचे श्रेय घेण्यासाठी अनेक चेहरे पुढे दिसत आहेत. पण, कार्यकर्ता पक्ष सोडून जात असताना निर्माण झालेल्या परिस्थितीची जबाबदारी कोण स्वीकारणार? कार्यकर्ता परत येणे निश्चितच आनंदाची बाब आहे; मात्र तो पक्ष सोडून जाण्याची वेळच का आली, याचे आत्मपरीक्षण झाले, तरच त्या स्वागताला खरा अर्थ प्राप्त होईल.

चर्चा रवींच्या वाढदिवसाची

सरकारी प्रशिक्षक आणि शरीरसौष्ठव स्पर्धातील लोकप्रिय समालोचक रवी देसाई यांच्या वाढदिवसाने कुडचड्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वाढदिवसाला आमदार निलेश काब्राल, मंत्री सुभाष फळदेसाई, उद्योगपती आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सरकारी प्रशिक्षकाच्या वाढदिवसाला एवढा मोठा राजकीय लवाजमा जमल्याने हा केवळ वाढदिवस होता की राजकीय वजन वाढवण्याचा प्रकार अशी मिश्किल चर्चा रंगली. गोव्यात निवडणुका जवळ आल्या की केकवरील मेणबत्त्यांपेक्षा व्यासपीठावरील खुर्चा आणि उपस्थितांची संख्या जास्त मोजली जाते, असे म्हणतात. त्यामुळे आता कुडचड्यात एकच प्रश्न विचारला जात आहे. रवी देसाई यांनी फक्त वाढदिवस साजरा केला, की भविष्यातील राजकीय इनिगची हलकीशी झलक दाखवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news