महाड; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या असलेल्या प्रमुख 13 मागण्यां संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. हा मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाचा विजय असून राज्यातील महायुती शासनाचाही विजय आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे.
जरांगे- पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. त्याबद्दल त्यांचे देखील आमदार गोगावले यांनी अभिनंदन केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या घोषणेनंतर गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून महाड येथील मराठा समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण बुवा गरुड यांना पेढा भरून हा आनंद साजरा केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते बिपिन म्हामुणकर, शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, माजी नगरसेवक नितीन आरते, दीपक सावंत, पप्या आंबवले, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते.