Raigad News : मांजर्‍या सापाचे अस्तित्व सह्याद्रीमध्ये अबाधित | पुढारी

Raigad News : मांजर्‍या सापाचे अस्तित्व सह्याद्रीमध्ये अबाधित

जयंत धुळप

रायगड : अंगावर मांजराच्या त्वचे सारखा रंग आणि चट्टे असल्याने मांजर्‍या या नावाने ओळखला जाणारा साप नुकताच सुधागड तालुक्यात पाली येथे आढळल्यावर, सर्पमित्रांनी त्यांच्या येथील अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे. कॅट स्नेक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या सापाचे शास्त्रीय नाव फॉस्टेन कॅट स्नेक असे असून, हा साप सहज आढळणारा साप नसून हा झाडाच्या छिद्रात, घरट्यात, ढोलीत आढळतो. परिणामी, तो सहजगत्या दिसून येत नसल्याने त्यांचे अस्तित्व लयास गेले आहे, असा एक समज आहे. मात्र सह्याद्रीमध्ये याचे अस्तित अबाधित असल्याची माहिती ज्येष्ठ पक्षी व प्राणी अभ्यासक तथा सिस्केप पक्षी-प्राणी संशोधन संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.

मांजर्‍या साप आकाराने लहान तसेच मध्यम, गोल व वरील भागावर गुळगुळीत खवले, मान सडपातळ, बटबटीत डोळे, चपटे डोके, सर्वांगावर ठळक नक्षी असा असतो. मांजर्‍या सापाच्या मादीची लांबी सरासरी 65 सेमी असते. जन्माच्यावेळी 25 सेमी असणारी लांबी अधिकाधिक 1.25 मीटर पर्यंत असते. लांब शरीर व निमुळती होत गेलेली टोकदार शेपटी असा असणारा हा साप अंगाने सडपातळ असतो. त्यांचे शरीर व शेपटीही त्यामानाने लांब असते. शेपटी निमुळती होत होत शेवटी ती अत्यंत बारीक झालेली असते. या सापावर गर्द रंगाच्या खुणा असतात. डोक्यावर इंग्रजी वाय आकाराचे चिन्ह असते. शरीराच्या खालच्या भागाचा रंग पांढुरका किंवा पिंगट असतो. पोटावर खवले असतात. कधी कधी पोटावरील प्रत्येक खवल्यावर बारीक बारीक ठिपके असल्याचेही आढळून येते. खवले गुळगुळीत असतात; पण ते रंगाने मंद असतात, असे मेस्त्री यांनी सांगितले.

मांजर्‍या साप व फुरसे यात बरेचसे साम्य आहे. त्यामुळे या सापांनाही फुरसे समजण्याची अनेकदा गल्लत होते. महाराष्ट्रातील अनेक गावांत त्याला मोठे फुरसे म्हणतात. मांजर्‍या सर्प जाड फुरशापेक्षा लांब व सडपातळ असतो. भारतात या सर्पाच्या एकूण अकरा उपजाती आहेत. मांजर्‍या सर्पाव्यतिरिक्त या जातीचे इतर साप डोंगराळ प्रदेशात आढळतात. त्यांपैकी फॉरस्टेन मांजर्‍या सर्प 2 मीटर लांब असतो. अंदमान व निकोबार बेटांवर मांजर्‍या सापांचे अस्तित्व जसे आहे, तसेच भारतात सर्वत्र पठारी प्रदेशात हे साप आढळून येतात. हिमालयातला मांजर्‍या सर्प मात्र समुद्रसपाटीपासून 3000 मीटरपर्यंत सापडतो, असे वैशिष्ट्य मेस्त्री यांनी सांगितले.

मांजर्‍या सर्पाला निम्न सदाहरित, सदाहरित भागात ताडपान साप म्हणून ओळखतात. कारण ते दिवसा बहुतेक ताडाच्या पानांत वेटोळे घालून बसलेले असतात. दिवसा कित्येक वेळा ते झुडपे, गवताने शाकारलेली घरांची छपरे किंवा झाडांच्या सालीखाली थंडाव्याला राहतात. आणि त्यामुळे ते पटकन दिसूनदेखील येत नाहीत. मांजर्‍या सापाचे विष सौम्य असते. त्यामुळे त्याने पकडलेले भक्ष्य निपचित पडून राहते. ते पूर्णपणे मरत नाही. या जातीचे साप निरुपद्रवी आहेत. मात्र चवताळले की, सर्वांगाचे घट्ट वेटोळे करून त्यातून डोके आणि त्याचवेळी शेपटीही थरथर हलवीत असतात. त्यांना टोचले तर ते उलटे होऊन निपचित मृतवत पडून राहतात असल्याचे निदर्शनास आल्याचे निरीक्षण मेस्त्री यांनी सांगितले. सापसुरळी व इतर प्रकारचे सरडे, उंदीर, छोटी वटवाघळे व लहान पक्षी हे मांजर्‍या सापाचे भक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

दक्षिण भारतातील बर्‍याच भागात मांजर्‍या साप सामान्यपणे आढळून येतात. नजरेत न भरणार्‍या इतर सापांप्रमाणे किंवा रात्री हिंडणार्‍या सापाप्रमाणे ते क्वचितच द़ृष्टीस पडतात. भारतातील या वैशिष्ट्यपूर्ण सापाचा सखोल अभ्यास अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी केल्याचे मेस्त्री यांनी सांगितले.

Back to top button