कोण होईल रायगडचा नवा खासदार ? | पुढारी

कोण होईल रायगडचा नवा खासदार ?

अतुल गुळवणी

अलिबाग : सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रायगडचा नवा खासदार कोण होईल याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागलेली आहे. बदललेली राजकीय परिस्थिती, सर्वच राजकीय पक्षांमध्ये झालेली फाटाफूट, कोणता झेंडा घेऊ हाती असे म्हणणारे कार्यकर्ते आणि गोंधळलेले मतदार असे वातावरण सध्या रायगडात दिसत आहे. यानिमित्ताने नवा चेहरा शोधण्याचा प्रयत्न रायगडातील मतदार करतील का, याबाबत कमालीची उत्सुकता लागलेली आहे.

लोकसभेसह विधानसभा निवडणुका या रायगडात महायुती विरुद्ध इंडिया महाविकास आघाडी) अशाच लढल्या जातील हे आता अधोरेखित झालेले आहे. मात्र यामधून नेमके कोण विजयी होणार है कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नसल्याने रायगडचा नवा खासदार नेमका कोणत्या पक्षाचा असू शकतो हे सांगणे आजमितीस तरी अवघड आहे. कारण प्रत्येक पक्षात पडलेली फूट यामुळे पक्षीय मतदानाचे होणारे विभाजन हे प्रस्थापितांना धोकादायक ठरणारे आहे.

काँग्रेसची मते ठरतील निर्णायक

रायगडात काँग्रेसची मते निर्णायक ठरू शकतात. कारण शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे मतदार फुटणार हे निश्चित त्या तुलनेने रायगडात कॉंग्रेस कमकुवत असली तरी ती अद्यापही एकसंघ आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चित होऊ शकतो. कारण आजही रायगात काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसला जिल्हयात समर्थ नेतृत्व नसले तरी पक्षाच्या विचारांचा मतदार मोठा आहे. तो केवळ आणि केवळ पक्ष सांगेल त्यालाच प्रामाणिकपणे मतदान करीत आलेला आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात जिल्ह्यातील काँग्रेस मतदारांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले तर आश्चर्य वाटायला नको. याचा फायदा महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार अनंत गीते यांना होऊ शकतो. अर्थात गीते है किता मतदान खेचतात यावरही त्यांचा विजय •अवलंबून आहे. आजतरी हा प्राथमिक अंदाज आहेत. मे २०२४ मध्ये लोकसभेची मुदत संपणार आहे. तोपर्यंत आणखी काही राजकीय बदल झाले तर त्याचे परिणाम रायगडातील निवडणुकीवर होऊ शकतात, तुर्तास इतकेच.

शेकापची माघार गीतेंच्या पथ्यावर

लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा शेकापने केलेली आहे. पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणूक आम्ही लढविणार नसल्याचे सांगितले. ते सांगताना महाविकास (इंडियन) माध्यमातून निवडणुका लढविल्या जातील हेही स्पष्ट केले. याचाच अर्थ शेकापचा महाविकास आघाडीला पाठिंबा राहणार हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीतून शिवसे नेचे अनंत गीते हे उभारणार असल्याने त्यांना अलिबाग, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, मुरुड आदी तालुक्यातील शेकापच्या हक्काच्या मतदानाचा फायदा होऊ शकतो.

धैर्यशील पाटील की तटकरे

भाजपने रायगडात एकसंघ असलेल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये फूट पाडून पेणचे माजी आ. धैर्यशील पाटील यांना लोकसभेसाठी उभे करून भाजप रायगडात आपली ताकद अजमाविणार आहे. पण आता महायुतीत राष्ट्रवादीत सहभागी झालेला असल्याने या मतदार संघावर विद्यमान खासदार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा राहणार आहे. ते धोरण ठरले तर धैर्यशील पाटील यांचा पत्ता आपोआपच कट होऊ शकतो. तडजोड म्हणून भाजपला हा मतदार संघ मिळाला तर धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी निश्चित होऊ शकेल. पण त्यांची ओळख ही महाड, पोलादपूरच्या वेशीपर्यंतच आहे. दापोली, गुहागरमधील मतदारांना ते नवखेच ठरणार आहेत. त्यामुळे त्या मतदार संघात ते किती चालतील हा एक संशोधनाचाच विषय ठरणार आहे.

गीतेंची कस लागणार

रायगडात गीते यांनीच आपणच लोकसभेचे उमेदवार असल्याचे वारंवार जाहीर केले आहे. आता त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उभारणार हा एक औत्सुक्याचा विषय आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे की भाजपचे धैर्यशील पाटील या दोषांपैकी कुणीही उभे राहिले तरी रागात दुरंगी लढत अटळ आहे. जर भाजपकडून धैर्यशील पाटील अथवा सुनील तटकरे उभे राहिले तर त्यांच्या पराभवासाठी शेकाप आपली सारी शक्ती पणाला लावल्याशिवाय राहणार नाही. तर महायुतीकडून गीतेंच्या पराभवासाठी मोठी मोर्चेबांधणी भाजप शिंदे गट केल्याशिवाय राहणार नाही,

Back to top button