पनवेल: विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्सचे महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण | पुढारी

पनवेल: विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्सचे महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्सनी पनवेल महापालिकेविरोधात आज (दि.१२) लाक्षणिक उपोषण केले. कामगार कायद्यानुसार आशा वर्कर्सला १५ ते २० हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे २४४ आशा वर्कर्स उपोषणाला बसल्या होत्या.

आशा वर्कर्स ला सन्मान पूर्वक वागणूक देण्यात यावी, कामगार कायद्यानुसार वेतन द्यावे. कामाची वेळ निश्चित करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मागील 3 ते 4  वर्षापासून पालिकेच्या आरोग्य विभागात आम्ही काम करत असून केवळ 4 ते 5 हजार इतके तुटपुंजे मानधन मिळत आहे. पनवेल महापालिका आम्हाला केवळ दिवसाला 33 रुपयामध्ये राबवून घेत असल्याचा आरोप आशा वर्कर्सने केला. महापालिका आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

 पालिकेकडून केवळ दिवसाला 33 रुपये मानधन

आशा वर्कर्स यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मानधन दिले जाते. या दोघांचे मानधन हे 4 ते 5 हजार  रुपये इतके दिले जाते, हे मानधन दिलेल्या कामाच्या स्वरूपावरती ठरले जाते, त्या व्यतिरिक्त पनवेल महापालिकेकडून दिवसाला 33 रुपये इतके मानधन दिले जाते.

आशा वर्कर्स यांच्या मागण्या

1. मानधनाऐवजी पगार देण्यात यावा, तसेच सरकारी कर्मचारी दर्जा देऊन सर्व लाभ देण्यात यावे.
2. कामाचे तास निश्चित करून शासन नियमावलीनुसार काम दिले जावे. नियमानुसार सुट्टी, रजा देण्यात याव्यात.
3. ऑनलाइन कामे देण्यात येऊ नये.
4. इतर कर्मचाऱ्यांची कामे देण्यात येऊ नये
5. पालिकेचे अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे. सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी
6. माता मृत्यू व बालमृत्यूसाठी फक्त आशा यांना जबाबदार धरू नये.
7. विमा उतरावा व सुरक्षितेचे सर्व साधने पुरवावीत.

हेही वाचा 

Back to top button