रायगड जिल्ह्यात बहरतेय समृद्ध जैवविविधता

रायगड जिल्ह्यात बहरतेय समृद्ध जैवविविधता

पाली; संदेश उतेकर :  रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला एक जिल्हा आहे. येथे पक्ष्यांच्या ४२६ प्रजाती आढळतात. राज्य पक्षी हरियाल, राज्य फुल ताम्हण, राज्य प्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन येथे आढळतात. शिवाय निसर्ग व कांदळवन पर्यटन देखील बहरले आहे.

जिल्ह्याचे एकूण क्षेत्र सात हजार १४८ चौरस किलोमीटर इतके आहे. २००५ च्या अहवालानुसार ३४.०६ टक्के जमीन वनांनी व्यापलेली आहे. जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ एक चतुर्थांश क्षेत्रावर वने आहेत. तब्बल २४० किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि जोडीला जैवविविधतेला आधार देणारी कांदळवने देखील आहेत. पूर्वेकडील सह्याद्री पर्वतरांगाचा प्रदेश किनाऱ्यालगतचा खलाटीचा प्रदेश व पूर्वेकडील डोंगराळ भाग यांच्या मधील मैदानी व सखल भाग आणि किनाऱ्यालगतचा खलाटीचा प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण स्वाभाविक रचना आहे.

पूर्वेकडील सह्याद्री रांगांच्या डोंगराळ प्रदेशात कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड व पोलादपूर या तालुक्याचा पूर्व भाग समाविष्ट होतो. पनवेल, पेण, रोहे, माणगाव, म्हसळे व महाड या तालुक्याचा बराचसा भाग जिल्ह्यांच्या मध्य भागातील सखल व मैदानी प्रदेशात मोडतो. अनेक नद्यांच्या छोट्या-मोठ्या खोऱ्यांनी हा सखल व मैदानी भाग सुपीक बनला आहे.

जिल्ह्यातील वनांमध्ये साग, ऐन, खैर, आंबा, चिंच यासारखे वृक्ष आहेत. येथील वनांमध्ये बिबटे, भेकर, वाघ, कोल्हो, रानडुक्कर, दुर्मिळ चौशिंगा यांसारखे प्राणी आढळतात. उरण तालुक्यात घारापुरी, अलिबाग येथील कार्लेखिंड जवळ व माथेरान येथे वनोद्याने आहेत. फक्त कर्नाळा आणि फणसाड अभयारण्य नाही तर जिल्ह्यातील सर्वच भागात विविध प्रकारचे पक्षी, झाडे व प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. यामध्ये मलबार, गिधाडे, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लाय कॅचर, भोरडया, तांबट, कोतवाल, पांढर्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीन ससाणा, टिटवी, बगळे, तिबोटी खंड्या असे अनेक पक्षी आढळतात.

पक्षी अभयारण्य

पनवेल तालुक्यात कर्नाळा येथे पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात

रायगड जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय निसर्गसंपन्न जिल्हा असून येथे घनदाट जंगले आहेत, नद्या आहेत, दलदलीचे प्रदेश आहेत, दक्खन पठारांप्रमाणे येथे मोठी पठारे देखील आहेत, माळराने आहेत, सडे आहेत, कांदळवने, समुद्रकिनारे आहेत जेथे हजारो परदेशी स्थलांतरित पक्षी थंडीमध्ये दाखल होत असतात, येथे अनेक अतिदुर्मिळ तसेच संवेदनशील पक्षी प्रजातींचे आणि प्राण्यांचे वास्तव्य आहे.

      – शंतनु कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news