Shivrajyabhishek 2023 : रायगडावर उसळला शिवसागर | पुढारी

Shivrajyabhishek 2023 : रायगडावर उसळला शिवसागर

किल्ले रायगड, इलियास ढोकले/श्रीकृष्ण बाळ : देशाच्या कानाकोपर्‍यांतून लाखोंच्या संख्येने दुर्गराज किल्ले रायगडावर आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत मंगळवारी 349 वा श्री शिवराज्याभिषेक दिनाचा (Shivrajyabhishek 2023) सोहळा अपार उत्साहात साजरा झाला. आजच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे सुमारे चार लाख शिवभक्त साक्षीदार बनले होते. किल्ले रायगडावरील वातावरण शिवभक्तांच्या सळसळत्या उत्साहाने भरून गेले होते. वाटत होते रायगडावर जणू शिवसागर उसळला!

किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला जलाभिषेक केला. त्यानंतर सुवर्ण होनांनी अभिषेक घालण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा सशस्त्र पोलिस दलाच्या तुकडीने सलामी दिली. शिवराज्याभिषेकाच्या विधीनंतर संभाजीराजे यांनी देशभरातून राजसदरेवर उपस्थितीत शिवभक्तांना संबोधित केले.

संभाजीराजे म्हणाले, राज्यातील 50 किल्ले आपल्या ताब्यात द्यावेत. त्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून एक रुपयाही न घेता स्वखर्चाने या किल्ल्यांचे संवर्धन करू. किल्ले रायगडचा ताबाही केंद्रीय पुरातत्त्व खात्याने रायगड विकास प्राधिकरणाकडे द्यावा, अशी आग्रही मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली.

श्री शिवराज्याभिषेक दिनाचा हा सोहळा केवळसोहळा राहिला नसून तो लोकोत्सव झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा 349 वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार साजरा करण्यात आला.

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन टक्के गुण जरी आपणात आले तरी जीवनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. सामाजिक वा राजकीय क्षेत्र असो, तेथे राजांना अभिप्रेत असलेली कामे करणे अपेक्षित आहे. आपला मावळा सरदार, सरसेनापती, एवढेच काय; अष्टप्रधान मंडळातही येऊ शकतो, हा विश्वास महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये रुजविला. आपल्याला राजांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे ते म्हणाले. (Shivrajyabhishek 2023)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचाड येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी 50 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याचे स्वागत करतानाच शिवकाळातील 300 किल्ल्यांबाबतही विचार करणे अपेक्षित होते, असे मतही त्यांनी नोंदवले. शासनाने राज्यातील 50 किल्ले आम्हाला दत्तक द्यावेत. शासनाकडून एक रुपयाही न घेता त्याचे संवर्धन आम्ही करू. किल्ले रायगडावर गेले चार दिवस शाहिरी, मर्दानी आखाडे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार्‍या कलाकारांनी एक रुपयाही मानधन घेतलेले नाही. शिवभक्त याहीपेक्षा अजून बरेच योगदान देऊ शकतो, असे ते म्हणाले.

राजदरबारात झालेल्या मुख्य सोहळ्यावेळी आमदार रोहित पवार, आ. अनिकेत तटकरे, माजी राज्यमंत्री आ. सतेज पाटील, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत आदींसह सर्व पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Back to top button