उरण; राजकुमार भगत : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर १ जूनपासून खोल समुद्रातील मासेमारी बंदी सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उरण, रेवस, बोडणी, अलिबाग, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन आदी मच्छीमारी बंदरांचे किनारे मच्छिमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. जिल्ह्यात सुमारे सात हजार २०० मच्छीमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. १ जून ते ३१ जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारी बंदीचा हा कालावधी असल्याने मच्छीमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी नांगरून ठेवल्या आहेत.
जून – जुलै हा महिना माश्यांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा आणि या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते १ ऑगस्ट या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छिमार बांधव देखिल या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात.
जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजिवीका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. १५ लाखांच्या वर कुटुंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ ४ लाख ६८ हजार मेट्रीक टन मासळी पकडली जाते.
उरण तालुक्यात देखिल मच्छिमारांची संख्या लक्षणीय आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक लोक खोल समुद्रात जाऊन मच्छिमारी करतात. या दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षीतांचे जीणे जगत असतो. शासनाने या कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. मच्छीमारांना शासनाने देऊ केलेला डिझेलचा परतावा प्रत्यक्षात वर्षानुवर्षे मिळत नाही. त्यातच परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण हा आत्ता महाराष्ट्राच्या मच्छिमारांसाठी मोठी समस्या झाली आहे. उरण तालुक्यातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, शेवा, नागाव, दिघोडे, आवरे, कोप्रोली, खोपटे, वशेणी आदी गावातील हजारो लोक मासेमारीचा व्यवसाय करतात.