रायगड : श्वानाला आंघोळ घालायला गेलेले बहीण भाऊ बुडाले | पुढारी

रायगड : श्वानाला आंघोळ घालायला गेलेले बहीण भाऊ बुडाले

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा :  कल्याण ग्रामीणमधील दावडी गावच्या तलावात श्वानाला आंघोळ घालायला गेलेल्या दोघा बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. रणजित रवींद्रन (२३) आणि कीर्ती रवींद्रन (१५) या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्रिशमन दल आणि मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

डोंबिवली पश्चिम उमेशनगर परिसरातील साई श्रद्धा चाळीत राहणारे दोघे भावंड आपल्या श्वानाला आंघोळ घालण्यासाठी प्रत्येक रविवारी दावडी येथील तलावात जात होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते श्वानाला आंघोळ घालायला तलावाच्या काठी गेले होते. मात्र किर्तीचा पाय घसरला आणि ती तलावाच्या पात्रात पडली. किर्तीला वाचवण्यासाठी गेलेला रणजित देखील तलावाच्या पात्रात उतरला आणि तो देखिल बुडायला लागला. दोघेही मदतीसाठी परिसरात आवाज देत होते. तलावाच्या बाजूला राहणाऱ्या एका नागरिकाने त्यांना वाचवण्यासाठी उडी देखील तलावात टाकली होती. मात्र दोघेही बचावासाठी योग्य प्रतिसाद देत नव्हते. काही वेळाने दोघेही दिसेनासे झाल्यानंतर या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना देण्यात आली.

ही माहीती मिळताच माजी नगरसेवक जालिंदर पाटील, ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस अधिकच तपास करत आहेत. दरम्यान, आई वडील आणि रणजित आणि कीर्ती हे कुटुंब राहत असलेल्या उमेशनगरमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे.

श्वान सुखरूप…

श्वानांची आंघोळ कारण्यासाठी कीर्ती आणि रणजित हे आठवड्याच्या प्रत्येक रविवारी दावडी गावच्या डोंगराजवळ असलेल्या तलावाच्या काठी जात असत. मात्र रविवारीच त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून श्वान मात्र सुखरूप आहे.

Back to top button